सोलापूर/करमाळा - ज्या सिनेमागृहात नागराज मंजुळेंनी अमिताभ बच्चन यांचे डायलॉग ऐकले व पाठ केले, ते सागर चित्रपटगृह सध्या बंद पडले आहे. त्यामुळे, करमाळाकरांना अमिताभची भूमिका असलेला करमाळ्याच्या पुत्राने साकारलेला 'झुंड' हा चित्रपट पाहता येत नाही. तर, करमाळ्यापासून 150 किमी दूर सोलापूर, पुणे, अहमदनगर या शहरांकडे जाऊन हा चित्रपट पाहण्याची वेळ करमाळावासियांवर आली आहे. त्यामुळे, गावकऱ्यांची निराशा झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर आणि सिनेसृष्टीत धुमाकूळ घातलेल्या झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे मूळ करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे रहिवाशी आहे. ते लहानपणी करमाळ्यात चित्रपट पाहण्यासाठी येत, मात्र, पैसे नसल्याने अनेकदा सिनेमागृहात भिंतीवरुन उड्या घेऊन सागर चित्रपटगृहात पडद्याच्यामागून जाऊन चित्रपट पाहिले आहेत. करमाळ्यात सागर हे एकमेव चित्रपटगृह होते. मात्र, तेही बंद पडलेले. मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाचा प्रीमीयर शो येथे झाला होता. तेव्हा अजय-अतुल करमाळ्यात आले होते. अभिनेत्री रिंकू राजगुरू, आकाश ठोसर ही जोडीही करमाळ्यात आली होती. तेव्हा करमाळ्यात मोठी मिरवणूक काढण्यात आली. मंजुळेंना चित्रपट पाहण्याची आवड होती. त्यांनी करमाळ्यातच अनेक चित्रपट पाहिले. तेव्हाच आपणही भविष्यात चित्रपटा साकारायचा मानस त्यांनी व्यक्त केला व तो त्यांनी सत्यातही उतरवला. ‘फिस्तुल्या’ हा त्यांचा पहिला लघुपट होता. त्यानंतर त्यांनी ‘फॅन्ड्री’ हा चित्रपट साकारला. त्यानंतर त्यांचा ‘सैराट’ हा चित्रपट आला. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या स्थानावर नेले. त्यांच्या ‘नाळ’ या चित्रपटानंतर ‘झुंड’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
शुक्रवारी (दि. ४) हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे, मात्र ज्या ठिकाणाहून नागराज मंजुळे चित्रपट बनवण्याचे स्वप्न पाहत होते, ज्या करमाळ्याच्या चित्रपटगृहात अमिताभचे चित्रपट पाहत होते तेच सिनेमागृह सध्या बंद आहे. नागराज मंजुळे यांचा यापूर्वी प्रदर्शित झालेला ‘नाळ’ चित्रपट करमाळ्यातील सागर टॉकीजमध्ये प्रदर्शित होईल, असे स्वतः नागराज यांनी सांगितले होते, मात्र तोही सिनेमा करमाळ्यातील सागर या सिनेमागृहात आला नाही. तेव्हापासून येथील चित्रपटगृह बंदच आहे. करमाळ्यात ‘सैराट’ चित्रपटाचा प्रीमियर शो दाखवण्यात आला होता. ‘नागराज मंजुळे हे लहान असताना सागरमध्ये सिनेमा पहायला यायचे. सागर सिनेमागृह हे सिंगल स्क्रीन आहे. येथे बैठकसंख्या जास्त असल्याने तेवढे प्रेक्षक येत नव्हते. सध्या इंटरनेट व मोबाइलमुळे प्रेक्षक सिनेमागृहापासून दुरावले आहेत. मात्र हे सिनेमागृह लवकरच सुरू करणार आहोत.
अनुप दोशी, मालक, सागर सिनेमागृह
करमाळ्याच्या मातीत जन्मलेल्या आणि उच्चस्थानापर्यंत पोहोचलेल्या नागराज मंजुळे यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचा झुंड चित्रपट पाहण्याची उत्सुकता आहे; पण करमाळ्यातील सिनेमागृह बंद आहे. पुणे येथे दोनशे किलोमीटर जाऊन चित्रपट पहावा लागेल, ही करमाळाकरांची खंत आहे.
प्रा. प्रदीप मोहिते, करमाळा