पंढरपूर : सध्या एकविसावे शतक सुरू असून, अत्याधुनिक यंत्रांचा मानवी जीवनावर प्रभाव आहे. असे असतानाही अशा बदलत्या युगात वडार समाज बांधवांनी बैलगाडीने पंढरपूरची माघी यात्रा करण्याची ह.भ.प. लक्ष्मण महाराज दिंडी सोहळ्याची १०३ वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.
पंढरीत भरणाºया माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी सोलापूर, लातूर, उस्मानाबाद व पुणे आदी भागातील वडार समाज बांधव एकत्र येऊन बैलगाडीसह दिंडी काढतात. या दिंडीत ५७ बैलगाड्यांचा वापर करण्यात आला आहे. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक बैलगाडीमध्ये एक कुटुंब विसावलेले असते. त्याचबरोबर त्या कुटुंबासाठी लागणारे जेवण बनवण्यासाठी भाजीपाला, गॅस शेगडी व सिलिंडर, साहित्य, कपडे व अन्य आवश्यक वस्तू घेण्यात येतात.
या बैलगाडी दिंडीची सुरुवात सोलापुरातून १ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. कोंडी, पोखरापूर, तुंगत व विसावा या गावात मुक्काम करून पंढरपूरनजीक विसावा याठिकाणी ३ फेब्रुवारीला सायंकाळी पाचच्या सुमारास पोहोचली. ४ फेब्रुवारीला पहाटे त्या दिंडीचे पंढरपूर येथील आंबेडकर नगर येथे आगमन होते. माघी एकादशीला वडार समाजाच्या मठात गुलाल उधळला जातो. द्वादशीला पुन्हा दिंडी माघारी जाण्याच्या दिशेने प्रस्थान करते.
एका बैलगाडीला ८ हजार रुपये भाडे- बैलगाडीचा वापर करून माघी यात्रेसाठी पंढरपूरला येण्याची वडार समाजाची परंपरा आहे. यामुळे सोलापुरातून भाड्याने बैलगाडी घेऊन ह.भ.प. लक्ष्मण महाराज दिंडीतील भाविक पंढरपूरची वारी करतात. एका बैलगाडीसाठी त्यांना आठ हजार रुपये भाडे मोजावे लागतात. यामध्ये बैलांच्या चाºयासाठी ३ हजार रुपये खर्च, उर्वरित रक्कम नफा म्हणून मिळते. परंतु याबरोबर वारी केल्याचाही आनंद मिळत असल्याचे आत्माराम नारायण गाटे (बैलगाडी चालक, रा. वडजी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) यांनी सांगितले.
१९१६ सालापासून माघी यात्रेची परंपरा ह. भ. प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांनी चालू केली. वडार समाजामध्ये पांडुरंगाच्या भक्तीचा जागर करण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळी त्यांनी बैलगाडीतून पंढरपूरला येण्याची परंपरा सुरू केली होती. ती परंपरा आजतागायत सुरू आहे. - ह.भ.प. रामदास जाजूजी इरकल महाराज, ह. भ. प. लक्ष्मण महाराज दिंडी सोहळा.
मी सोलापूरचा रहिवासी असून, सध्या पुण्यामध्ये राहतो. तेथे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतो. माझ्याकडे चारचाकी वाहन आहे. परंतु समाजाची परंपरा बैलगाडीतून दिंडी करण्याची आहे. यामुळे कुटुंबासह बैलगाडीतूनच पंढरपूरची वारी करतो. बैलगाडीतून प्रवास करण्याचा आनंद वेगळाच आहे.- सुशील बंदपट्टे, भाविक, पुणे.