सोलापूर : अंजनडोह (ता. करमाळा) शिंदेवस्ती येथील जयश्री दयानंद शिंदे (वय 30) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात ५ डिसेंबर २०२० रोजी मृत्यू झाला होता. आज पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शिंदे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. तसेच जयश्री यांच्या पतीला वन विभागात नोकरी देण्याचे आश्वासन श्री. भरणे यांनी दिले.
पालकमंत्री भरणे यांनी आज बिबट्याचा वावर असलेल्या करमाळा तालुक्यातील अंजनडोह येथे भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, आमदार संजयमामा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, मोहोळ परिक्षेत्राचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, प्रांताधिकारी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, सरपंच विनोद जाधव, पोलीस पाटील अंकुश कोठावळे, जि.प. सदस्य सवितादेवी राजेभोसले, जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष गुळवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
भरणे यांनी शिंदे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून दिलासा दिला. ते म्हणाले, ही दुर्दैवी घटना आहे, शासन तुमच्या पाठिशी आहे. शिंदे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहोत. बिबट्याला पकडण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अशा घटना होऊ नयेत, यासाठी वन विभागाने दक्षता घ्यावी. छोट्या-छोट्या वस्तीवर वीज वितरण कंपनीने त्वरित वीज द्यावी.
मृत जयश्री यांचे पती दयानंद धर्मराज शिंदे यांना आपली व्यथा मांडताना रडू अनावर झाले होते. त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी देण्याची मागणी केली. जयश्री यांना कार्तिकी (वय 10 वर्षे), दिव्या (वय 8 वर्षे) आणि सोहम (वय 4 वर्षे) अशी मुले आहेत. आईच्या मृत्यूने ती वडिलांना बिलगली होती. शिंदे कुटुंबियांना यापूर्वी पाच लाखांचा धनादेश वन विभागातर्फे देण्यात आला आहे.