सोलापूर : तेरा वर्षांपासून पगार न मिळाल्याने मार्डी येथील हणुमंत काळे यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अनुकंपावर पत्नीला नोकरीस घ्यावे, दोषींवर कारवाई करावी, थकित वेतन द्यावे या नातेवाईकांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.बुधवार 9 ऑगस्ट रोजी दूपारपासून नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. रात्री पाउणे एक वाजेपर्यंत नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयत थांबले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नातेवाईकांच्या मागणी लक्षात घेत तीन जणांची समिती नेमली. यात माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मारुती फडके, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, तृप्ती अंधारे यांचा समावेश होता. त्यांनी सर्व माहिती घेत रात्री पाऊणे एक वाजता नातेवाईकांना पत्र दिले.पत्र घेतल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे मान्य केले. गुरुवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला. नरोटेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या मागण्या केल्या मान्य -- शासनाच्या आदेशानुसार वेतन अदा करण्याची कारवाई होणार- अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर कारवाई होणार- प्रकरणातील दोषींवर कारवाईची बाब वरिष्ठ व शासन स्तरावर आहे.