आदिनाथ साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बारामती अॅग्रोला २५ वर्ष मुदतीच्या भाडेकराराने चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आ. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोसमोरील अडथळू दूर झाले आहेत. शिवाय बंद असलेला कारखाना आता सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आदिनाथ कारखान्याच्या १५ कि.मी. परिसरात ६ ते ७ लाख मे. टन उस उपलब्ध असणारा कारखाना आर्थिक संकटात सापडला होता. कारखाना बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अडचण वाढली होती. राज्य शिखर बँकेने दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करून गेल्या सहा महिन्यापूर्वी कारखाना भाडेकराराने चालविण्यास देण्याचा लिलाव केला. यामध्ये आ.रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोने शिखर बँकेच्या लिलावात सर्वाधिक बोली करून भाडेकराराने चालविण्यास घेतला. तरी सुध्दा गेल्या सहा महिन्यांपासून कारखान्याचा ताबा बारामती अॅग्रोने घेतलेला नव्हता. कारखाना १५ की २५ वर्ष भाडे कराराने द्यायचा या संदर्भात संचालक मंडळात मतभेद होते. सहकार कायद्यानुसार कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यास मान्यता मिळणे आवश्यक होते. त्यातच कोरोनाचे संकट असल्याने कारखान्याची वार्षिक सभा ऑनलाइन घेऊन अखेर २५ वर्षांसाठी आदिनाथ कारखाना बारामती अॅग्रोला भाडेकराराने देण्याचा ठराव बहुमताने संमत झाला. त्यामुळे बारामती अॅग्रो समोरील आदिनाथच्या भाडे कराराचा अडथळा आता दूर झाला आहे.
कोट ::::::::
कंदर बारामती अॅग्रोला साखर कारखानदारी चालविण्याचा अनुभव आहे. बंद पडलेल्या आदिनाथ कारखान्याचे चक्र बारामती अॅग्रो फिरवणार आहे. तालुक्यातील ऊस उत्पादकांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे.
- राजेंद्र बारकुंड,
ऊस उत्पादक, चिखलठाण