सोलापूर : घरच्या परिस्थितीसमोर हात न टेकवता त्यांनी मिळेल ते काम केले़ कधी काकांकडे केबल ऑपरेटर म्हणून काम केले़ तर कधी मेस चालवली. इतर छोटी-मोठी कामे करत त्यांनी कायदेशीर शिक्षण पूर्ण केले़ सोबत राज्य सेवा परीक्षाही दिली़ आता त्यांची मेहनत आणि जिद्द यशस्वी झाली असून ते चक्क न्यायाधीशाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले़ मुळात आई विडी कामगार आणि वडील हे सेवानिवृत्त सूत मिल कामगार अशा पार्श्वभूमीतून आलेले पूर्व भागातील सुनील लक्ष्मीपती येलदी हे न्यायाधीश बनले आहेत.
या मेहनती सुपुत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे़ सुनील हे सात्विक स्वभावाचे आहेत.ते हरे कृष्णा अर्थात इस्कॉन संप्रदायाचे शिष्य आहेत़ ते ३२ वर्षांचे आहेत़ विवाहित असून त्यांना दोन मुली आहेत़ २०११ पासून ते येथील कोर्टात क्लार्क म्हणून काम करताहेत़ त्यापूर्वी त्यांनी कुमठा नाका परिसरात केबल नेटवर्कमध्ये आॅपरेटर म्हणून काम केले़ त्यानंतर वालचंद कॉलेजच्या एमएसडब्ल्यू विद्यार्थ्यांकरिता मेस चालवली. विद्यार्थ्यांना त्यांच्या रुमवर मेसचे डबे देऊन यायचे.
वालचंद कॉलेजमध्ये बीएस्सीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते दयानंदमध्ये एलएल.बी. आणि एलएल.एम.चे शिक्षण पूर्ण केले़ दरम्यान, २०११ साली ते क्लार्कच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन येथील कोर्टात रूजू झाले़ क्लार्क झाल्यानंतर ते स्वस्थ बसले नाहीत़ तब्बल पाचवेळा न्यायाधीशाची परीक्षा दिली़ पाचव्यांदा त्यांचा नंबर लागला आणि ते १८७ क्रमांकाने उत्तीर्ण झाले़ अखेर न्यायाधीश होण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले.
सुनील लक्ष्मीपती येलदी यांच्या यशाबद्दल सोलापूरचे नव्हे संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे़ सुनील यांच्या हातून न्यायाच्या प्रतीक्षेत बसलेल्यांना लवकरच न्याय मिळेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली.
कट्टर स्पर्धक महापौर आल्या घरी- आई लक्ष्मीपती या विडी कामगार आहेत़ आजही त्या विडी काम करतात़ तर वडील लक्ष्मीपती हे सूत गिरणीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर मुमताज नगर, मार्कंडेय नगर, कुमठा नाका परिसरात सामाजिक कार्य करत राहिले़ यातून त्यांचा राजकीय संपर्क वाढला़ त्यामुळे त्यांनी एकदा महापालिका निवडणूक लढवली़ त्यानंतर त्यांनी सुनील यांच्या मातोश्रींना महापालिकेच्या निवडणुकीत उतरवले़ त्यांनीही तीन वेळा निवडणूक लढवली, तीही सोलापूरचे नूतन महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या विरोधात़ तिन्हीवेळा त्यांचा निसटता पराभव झाला़ त्यामुळे पूर्व भागात येलदीविरुद्ध यन्नम असा सामना अनेक वर्षे चालला़ सुनील हे न्यायाधीशांच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करायला महापौर यन्नम या येलदी यांच्या घरी आल्या़ पुष्पहार आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला़
कोर्टात क्लार्क म्हणून काम करताना न्यायाधीशांचे कामकाज जवळून पाहिले़ न्याय देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न भावला़ मनात न्यायाधीश होण्याची इच्छा निर्माण झाली़ त्यादृष्टीने अभ्यास सुरु केला़ यापूर्वी ४ वेळा अयशस्वी ठरलो़ पाचव्या प्रयत्नात यश मिळाले़ कोर्टात येणाºया प्रकरणात मध्यस्थीचा तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न राहील़ जेणेकरून दोन्ही पक्षकारांचे समाधान होईल़ मला माहीत आहे अशी शक्यता कमी असते, पण काही प्रकरणात ते शक्य असते़- सुनील येलदी, नूतन न्यायाधीश, सोलापूर