संताजी शिंदे
सोलापूर : जमिनीच्या प्रकरणात न्यायालयात न्याय मागण्यासाठी गेलेला झाडुवालीचा मुलगा ‘लॉ’चे शिक्षण घेऊन न्यायाधीश झाला. कुणाल कुमार वाघमारे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महापालिकेत सफाई कामगार असलेल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले.
आई महानगरपालिकेत बदलीवर झाडुकामगार होती. बदली कामगार म्हणून कधी तर काम लागत होते़ दरम्यान, घरचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी आई कस्तुरबा मंडई येथे भाजी विकत होती. आईला मदत म्हणून स्वत: कुणाल वाघमारे हे भाजी विकत होते. वडीलही बदली कामगारच होते. इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंत महानगरपालिकेच्या शाळा क्र.२१ मध्ये शिक्षण झालेलं. ८ वी ते १0 पर्यंतचे शिक्षण मनपाच्या शाळा क्र.२ मध्ये पूर्ण केले.
दयानंद कॉलेजमध्ये ११ वी ते बीएपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर २0१0 साली एमएसडब्लु पूर्ण केलं. २0१४ साली दयानंद महाविद्यालयातून ‘लॉ’ चे शिक्षण पूर्ण केलं. २0१६ साली एलएल़एम़चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सोलापूरच्यान्यायालयात प्रॅक्टिसला सुरूवात केली. पहिल्याच प्रयत्नात दि.७ एप्रिल २0१९ रोजी ‘लॉ’ ची एमपीएससी परीक्षा दिली. १ सप्टेंबर २0१९ रोजी मुख्य परीक्षा देऊन यश संपादन केले. ६ डिसेंबर २0१९ रोजी मुंबई येथे मुलाखत झाली आणि २१ डिसेंबर २0१९ रोजी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा निकाल लागला. कुणाल वाघमारे हे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी झाले.
दरम्यानच्या काळात घरची परिस्थिती बेताची असल्याने कुणाल वाघमारे यांनी आईसोबत भाजी विक्रीचा व्यवसाय केला. आजोबांसोबत पेंटरचे काम केले. नवी पेठेत एका दुकानात महिना ५00 रूपये पगारावर काम केले. एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत नाईट मॅनेजर म्हणून काम केले. एका अकौंटंटजवळ आॅफिसबॉय म्हणून काम केले. गुजरात येथे एका कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं. कृषी खात्यात कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम केले. जगण्याचा संघर्ष आणि शिक्षण सुरू असताना २0१२ साली कुणाल वाघमारे यांचे लग्न झाले, त्यांना दोन मुले आहेत. एमएसडब्लुचे शिक्षण झाल्यानंतर स्वत:च्या जमिनीच्या प्रकरणासाठी ते न्यायालयात गेले होते. खटला लढत असताना त्यांच्या वकिलांचं निधन झालं. हताश झालेले कुणाल वाघमारे यांना काय करावं ते कळत नव्हतं, तेव्हा न्यायालयातील त्यांच्या मित्राने त्यांना ‘लॉ’ करण्याचा सल्ला दिला. लॉसाठी प्रवेश घेतला आणि त्यांना त्यात आवड निर्माण झाली. न्याय मागण्यासाठी न्यायालयात गेलेले कुणाल वाघमारे हे आता न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून न्याय देणार आहेत.
आई-वडिलांचं अन् मित्रांचं स्वप्न पूर्ण केलं : कुणाल वाघमारे- वर्तमानपत्रात यशाच्या बातम्या यायच्या तेव्हा आई-वडील मोठ्या कुतुहलानं त्याची चर्चा करत होते. त्यांची माझ्याकडून असलेली अपेक्षा लक्षात घेतली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला. किंतु़़़ परंतु़़़ न करता मी अभ्यास केला. मला अॅड. शिरीष जगताप, अॅड. डब्लु.टी. जहागीरदार, अॅड. विवेक शाक्य, अॅड. तानाजी शिंदे, अॅड. गणेश पवार आणि अशोक शिवशरण यांचं वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं. यांना माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. न्यायाधीश ही अशी शक्ती आहे, की ज्याच्या माध्यमातून आपण न्याय देऊ शकतो हे लक्षात आल्यानंतर मी अभ्यास केला. आज यश मिळालं यातच सर्वकाही साध्य झालं, भविष्यात हायकोर्टात काम करण्याची इच्छा आहे, असे मत कुणाल वाघमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
कष्टाचं सार्थक झालं म्हणत आई गहिवरली...- पती व मी दोघेही काम करीत होतो, तीन मुलींची लग्ने केली. कुणाल शाळेत असताना राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मनपा शाळेतील शिक्षक शिवशरण गुरूजी यांनी मला तेव्हाच सांगितलं होतं की तुमचा मुलगा तुमचं नाव मोठं करेल. आज त्याचा आम्हाला साक्षात्कार झाला, आम्ही कामाला लाजलो नाही. घेतलेल्या परिश्रमाचं सार्थक झालं असं सांगत असताना कुणाल वाघमारे यांच्या आई नंदा वाघमारे यांना गहिवरून आले़