पंढरपूर : पावसाने ओढ दिली असतानाच भीमा नदीवरील बंधारे पूर्ण रिकामे झाले असल्याने नदीकाठच्या गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उजनी धरणातून १ जूनला पाणी सुटणार असल्याने नदीकाठावरील शेती तर धोक्यात आलीच आहे, त्याचबरोबर पाणी टंचाईही जाणवत आहे. तालुक्यातील नदीकाठच्या ४६ गावांवर सध्या जलसंकट कोसळले असून या गावातील पिण्याच्या पाण्याचे नदीकाठचे स्रोत बंद पडले आहेत. पुळूज, अजनसोंड, गुरसाळे, पटवर्धन कुरोली हे बंधारे पूर्ण रिकामे झाले असल्याने गावे तहानलेली आहेत. रोहिणी नक्षत्राच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात उजनीतून फक्त एकदाच भीमा नदीपात्रात पाणी सोडले आणि त्यानंतर मात्र उजनी वजा झाल्यावरही पाणी सोडण्याचा विषय आला नाही. पंढरपूर बंधार्यात सध्या १०-१५ दिवस पाणी शहराला पुरेल, अशी अवस्था असून पाण्याला वास येऊ लागला आहे.
----------------------
३१ मेनंतर बंधारे न भरण्याचा शासनाचा निर्देश आहे. त्यामुळे बंधारे भरले जाणार नाहीत. १ जूनला पावसाची परिस्थिती पाहून पाच ते सहा हजार क्युसेक्स पाणी उजनीतून सोडण्याच्या विचारात पाटबंधारे विभाग आहे. - अजयकुमार दाभाडे अधीक्षक अभियंता