सोलापूर : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मोटरसायकलवरून जात असताना ‘बीएमआयटी’ कॉलेजजवळ पाठीमागून येणाºया जीपने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या वकिलाचा गुरुवारी मृत्यू झाला. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता अपघात झाला होता.
अॅड. इस्माईल लालासाब शेख (वय ५२, रा. लोकमान्य नगर, आसरा चौक, सोलापूर) असे ठार झालेल्या वकिलाचे नाव आहे. अॅड. इस्माईल शेख यांच्या मामाच्या मुलीचे कवठे येथे निधन झाले होते. अंत्यविधी करण्यासाठी अॅड. ईस्माईल शेख हे पत्नीसोबत स्वत:च्या मोटरसायकलवरून जात होते. दोघे कवठे या गावाकडे जात असताना बीएमआयटी कॉलेजच्या अलीकडील आनंद नगर येथे पाठीमागून येणाºया जीपने जोरात धडक दिली. या धडकेत अॅड. ईस्माईल शेख व त्यांची पत्नी हे दोघे जखमी झाले. अॅड. ईस्माईल शेख यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता.
जखमी अवस्थेत त्यांना देगावजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी बुधवारी दुपारी २.३0 वाजता भाऊ मौला शेख यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी ९.३0 वाजता अॅड. ईस्माईल शेख यांचा मृत्यू झाला. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.
मुलीचे लग्न होण्याआधीच घेतला निरोप...- अॅड. ईस्माईल शेख यांना पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. मोठ्या मुलीचे शिक्षण एमएस्सीपर्यंत झाले आहे. दुसरी मुलगी इंजिनिअर असून तिसरी मुलगी कॉमर्स शाखेत शिकत आहे. मोठ्या मुलीचे लग्न ठरले असून १ मे २0१९ रोजीची तारीख काढण्यात आली आहे. अॅड. ईस्माईल शेख यांनी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू केली होती. मुलीचे लग्न होण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.
विनंती केल्यावर इस्माईल यांचा मोबाईल दिला....- सोमवारी दुपारी १२ वाजता अपघात झाला, दोघे पती-पत्नी जखमी झाल्यानंतर अॅड. ईस्माईल शेख हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हा अपघात पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. ईस्माईल शेख यांच्या खिशातील मोबाईल रस्त्यावर पडला होता. पत्नीने नातेवाईकांना कळवण्यासाठी मोबाईल पडला आहे तो द्या असे म्हणत होती; मात्र माणुसकी नसलेला व्यक्ती मोबाईल खिशात ठेवून फक्त बघ्याची भूमिका घेत होता. हात जोडून विनंती करीत पत्नीने मोबाईलची मागणी केल्यानंतर अर्ध्या तासाने मोबाईल दिला. मोबाईलवरून पत्नीने नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले. आपल्यासारख्या माणसाचा अपघात झाला आहे, तो तडफडत आहे. हे समोर दिसत असताना माणुसकी नसलेला व्यक्ती मोबाईल खिशात घालून शांतपणे बघ्याची भूमिका घेत होता.