आप्पासाहेब पाटील
सोलापूर : अक्षताची तयारी सुरू..मंडपात वऱ्हाडी जमलेले..नवरा-नवरा नटलेले..जो तो विवाहाच्या कामात व्यस्त असताना जिल्हा बालसंरक्षण कक्षासह बार्शी पाेलिसांची टीम मंडपात पोहोचली अन् १७ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा होणार बालविवाह रोखला.
दरम्यान, उळुप (ता. भूम जि. धाराशिव) येथील एका १७ वर्षीय बलिकेचा बालविवाह बार्शी तालुक्यातील एका २४ वर्षीय युवकांशी दु. १ वा होणार असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांना चाईल्ड लाईन १्र९९८ च्या द्वारे मिळाली. अतुल वाघमारे यांनी जिल्हास्तरावरून सर्व सूत्रे हलवून विवाहाच्या मुहूर्तावेळी होणारा बालविवाह रोखण्यात यश मिळविले. बालविवाह रोखण्याकामी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार शेख, महिला पोलीस कॉन्स्टेबल विद्या पवार, तालुका संरक्षण अधिकारी अमर जमदाडे यांचे पथक तयार केले होते. सदर पथक विवाहास्थळी पोचले असता विवाह लावण्यापूर्वीची विधी चालू असल्याचे दिसून आले. नवऱ्या मुलीस तिचे वय विचारले असता १७ वर्ष असल्याचे सांगितले. मुलीचे पालक व नातेवाईक आमचे लग्न नसून साखरपुडा असल्याचे भासवत होते. परंतु पोलिसी खाक्या दाखवताच लग्न असल्याचे मान्य केले.
या बालिकेची पथकाने चौकशी केली असता सदर बालिकेचे वय हे १७ वर्षे आठ महिने असल्याचे लक्षात येताच बालकेस पोलीस पथकाने आपल्या ताब्यात घेतले. बालिकेचा जबाब नोंदवून सदर बालिकेला माननीय बालकल्याण समिती सोलापूर यांच्या समक्ष हजर केले असून समितीने बालकेस बालगृहात दाखल करून घेतले आहे. हा बालविवाह रोखण्याची यशस्वी कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे,परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .