लोकांनी व्यायाम सुरू केल्याने केले दार बंद
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराभोवती सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामात ओपन जिममध्ये बसविण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर नागरिकांनी सुरू केल्याने पत्र्याचा शेड उभारून प्रवेश बंद करण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यावर दररोज सकाळी डॉक्टरांच्या उपस्थितीत या साधनांद्वारे शरीराला फायदेशीर व्यायाम कसा करायचा हे सांगितले जाणार आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुधारणा केल्या जात आहेत. मंदिराभोवती असलेल्या रस्त्यावर सकाळी फिरण्यासाठी शहरातील अनेक मंडळी येत असतात. त्यामुळे या मंडळींना सकाळी व्यायाम करता यावा म्हणून ओपन जिमची संकल्पना पुढे आली. स्मार्ट सिटी योजनेतून विष्णू घाट ते लक्ष्मी मार्केटजवळील प्रवेशद्वारादरम्यान ओपन जिमचे काम सुरू करण्यात आले आहे. यादरम्यान सिमेंट काँक्रीटच्या साहाय्याने व्यायामाचे साहित्य बसविण्यात येत आहे. हे साहित्य बसविल्याबरोबर सकाळी फिरायला आलेल्या हौशी मंडळींनी याचा वापर सुरू केला. त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारून ओपन जिमचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. फक्त काम पूर्ण करण्यासाठी तेथे काम करणाऱ्या कामगारांना प्रवेश दिला जात आहे. याचबरोबर महापालिकेसमोरील इंद्रभुवन बागेत यापूर्वी सुरू केलेल्या ओपन जिमची दुरवस्था झाली आहे. येथील साहित्य दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.
लोकमत फेसबुक लाईव्हची दखल
उद्घाटनाची वाट न पाहता लोकांनी ओपन जिमचा वापर सुरू केल्याचे लोकमत फेसबुकवर लाईव्ह करण्यात आले. याची दखल घेत स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ओपन जिमचा वापर बंद केला. उद्घाटनासाठी वापर बंद केला का, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली आहे.
ट्रेनर करणार व्यायामाला मदत
ओपन जिममध्ये साहित्य बसविण्यात येत आहेत. हे साहित्य काँक्रीटमध्ये फिट होण्याआधीच लोकांनी वापर सुरू केला आहे. त्यामुळे काँक्रीटमध्ये साहित्य फिट करण्यासाठी आठ दिवस वेळ दिला जाणार आहे. त्यानंतर काही दिवस या साधनांचा वापर कसा करायचा, यासाठी लोकांना ट्रेनरची मदत देण्यात येणार असल्याचे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.