डॉक्टर सांगत होते हल्ली आमच्याकडे येणाºया पेशंटच्या आजारांमध्ये व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. तसेच विविध व्याधीही असतात, पण सध्या एक नवीनच आजार मोठ्या वेगाने फैलावतो आहे तो म्हणजे मानसिक अस्वस्थता. छातीमध्ये धडधडणे, घाबरल्यासारखे होणे अशक्तपणा वाटणे आणि या साºयाचा एकूण परिणाम म्हणजेच कसंतरीच होणे. याची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. पेशंटला काय झालं म्हणून विचारलं की, जरा कसंतरीच होतंय, असं सांगतात. आता या कसंतरीच होतंय याचा इलाज कसा करायचा हा प्रश्न पडतो. काही औषधे दिली तरी परत येतात. आजार तोच. आमच्या अगोदरच विविध तपासणीची मागणी करतात, नव्हे करून घेतात, पण रिपोर्ट निल येतात. तरीही मनातला हा अस्वास्थ्याचा आजार कायम उरतोच. मग यांना काही सांगावं तरी समाधान होत नाही, नाही सांगावं तरी डॉक्टर बदलून पाहतात. इतका हा आजार माणसात भिनत चालला आहे.
खरंच आज या आजाराचं चिंतन गांभीर्यानं करावंच लागेल. कारण अगदी आबालवृद्धांना याची लागण होत आहे. याच्या मुळाशी जावंच लागेल. कारण कोणत्याही आजाराचे निर्मूलन मेडिकल सायन्स करू शकतं, पण याचा उपचार मात्र मनावर संवेदनशीलतेने करावा लागेल. वागण्या-जगण्याची पद्धत तपासून पाहावी लागेल. दररोजचा जीवनक्रम, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे काम, खाणे-पिणे, मोबाईल पाहणे, मित्र, सोबती, एकंदर धावपळ व मनस्ताप या साºया बाबींचे निरीक्षण करून जरूर तेथे काही बदल करावे लागतील. मनामध्ये विचारांचा होणारा गोंधळ, संभ्रम, चिंता यांचे समुपदेशन करणं गरजेचं आहे.
मित्राने परवा नवीन कार घेतली, गाडी फार छान व मस्त होती. नव्यानेच ड्रायव्हिंगही शिकला. घरापरिवारात आनंदोत्सव झाला, पण काही दिवसांपासून त्यांच्या छातीमध्ये धडधडणे सुरू झालं. सर्व काही तपासले, पण अस्वस्थ वाटू लागले. गाडीही बरी चालवायचा. मग कारण काय? याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा असं लक्षात आलं की, त्यानं गाडी घेतल्यापासून नेहमीच कार अॅक्सिडेंटच्या बातम्या पाहायला, वाचायला मिळू लागल्या आणि याचीच एक भीती मनात घर करून गेली की, माझंही असं काही झालं तर.. हा विचार तो करत होता, हे निदान झालं. त्यामुळे धडधड व अस्वस्थता वाढत गेली. ही आणि अशी अनेक छोटी-मोठी कारणं वा अनामिक समस्यांमुळेच आम्हाला जरा कसंतरीच होत आहे.
खरंतर मित्राची चिंताच मुळी निरर्थक होती. अपघात होतात, त्यात सर्वच प्रकारच्या वाहनांचा होत असतो. चालकाच्या विचलितपणामुळे वा यंत्रातील बिघाडामुळे तो होतो. याची भीती न बाळगता जर हजारो वाहनं सुरक्षित प्रवास आनंदाने करतातच ना? याचा अधिक विचार केला तर.. ही भीती निघून जाईल. म्हणजे जीवनात सकारात्मक विचारांची पेरणी करावी लागेल. चित्त शुद्ध करावं लागेल. आजाराचं, व्याधींचं चिंतन करण्यापेक्षा मनाला उभारी देणाºया आवडीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतील. पत, पैसा, प्रकृती, प्रॉपर्टी फारशी ओढाताण करून मिळवू नये. दोन घास सुखाचे समाधानाने आपल्या माणसासोबत खाता आले पाहिजेत. ई माध्यमाद्वारे हजारो मैलांवरच्या माणसाला लाईक देतो.
तितक्या प्रेमाने घरच्या भाजीला प्रेमाने लाईक मनमोकळेपणाने दिली तर भोजन व जीवन स्वस्थ, आनंदी होईल. मुलांशी, परिवाराशी सुसंवाद असावाच. त्यांची सुख-दु:खं व्यक्तिश: जपली, खाण्या-पिण्यात शिस्त, नियम पाळले तर कसंतरीच न होता चांगलंच होईल. मोबाईलमुळं आम्ही अबोल व मानसिक, शारीरिक विकाराने त्रस्त होत आहोत. आपलं जीवन सुंदर आहे. जगणं सुंदर करण्याची कला शिकावी लागेल. प्रत्येक श्वासाचे मोल कळायला हवं. कारण आयुष्याची कमाई नव्हे तर कुबेराचं साम्राज्य आपण देतो म्हटलं तर क्षणाचं आयुष्य आपण वाढवू शकत नाही. हे श्वासाचं मूल्य जाणवलं की, कसंतरीच वाटायचं कमी होईल. समस्येचं चिंतन जरूर करा. सोडविण्यासारख्या असल्या तर जरूर सोडवा, सोडवताच येत नसल्या तर खुशाल सोडून द्या. कारण काही समस्या सोडून देऊनच सोडवाव्यात लागतात. हा प्रयोग करून पाहा. नक्कीच आनंद मिळेल. म्हणून चिंता करू नका. आपण आपल्या परिवारासाठी, कुटुंबासाठी अनमोल आहोत, हे जाणावंच लागेल. याचं जाणतेपण लाभलं की, कसंतरीच नाही होणार.- रवींद्र देशमुख(लेखक शिक्षक अन् साहित्यिक आहेत.)