आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या व प्रखर वक्ता म्हणून महाराष्ट्रास परिचित असलेल्या प्राध्यापक डॉ.ज्योती वाघमारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. वाघमारे यांनी आपल्या वक्तृत्वाच्या बळावर अनेक व्यासपीठे गाजवलेली आहेत. शिवसेना पक्षाला एका नव्या उंचीवर नेता येणे शक्य व्हावे यासाठी पक्षाच्या प्रवक्तेपदी त्यांची नियुक्ती करण्यात येत असून तसे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले आहे. याबाबतची पोस्टही मुख्यमंत्री यांनी फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे.
मागील काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनिष काळजे यांनी विमानतळावर वाघमारे यांची भेट घडवून आणली होती. त्यावेळी अन्य पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षप्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा झाली होती. मात्र मुंबईत वाघमारे यांचा पक्षप्रवेश पार पडला.
काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षा, विधानसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या विधानसभा निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळणार्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. डॉ. वाघमारे या अभ्यासू व उत्कृष्ट वक्त्या आहेत. विचारधारा अन् संवाद कौशल्य पाहून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्याकडे महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीत त्या वंचित बहुजन आघाडीच्या मंचावर दिसून आल्या होत्या, त्यामुळे त्या वंचितमध्ये जाणार अशीही चर्चा होती.