सोलापूर: कर्नाटकातील जत्रेत केलेल्या चोरीच्या प्रकरणात नगरसेवकाच्या पत्नीसह तिघांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून, तिघांना सोलापुरात आणून कबुलीजबाबाप्रमाणे चौकशी केली असता शहरातील तीन सराफांकडून २० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई दोन दिवस सुरु होती. मुद्देमालासह आरोपींना कर्नाटकाकडे परत नेण्यात आले.
तिमव्वा लक्ष्मण जाधव (वय ५०), मीना बजरंग जाधव (वय ४०), उषा खांडेकर (वय ४५, सर्व रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील माहिती अशी की, कर्नाटकातील सिमोगा जिल्ह्यात श्री मल्लिकार्जुन देवस्थानच्या यात्रेत चोरी करताना वरील तिन्ही आरोपींना काही दिवसांपूर्वी रंगेहाथ दावणगिरी पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून न्यायालयामार्फत पोलीस कोठडी मिळवली होती.
या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने दावणगिरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बसवराजू आपल्या सहकाºयांसह तिन्ही आरोपींना घेऊन सोलापुरात आले होते. रविवारी व सोमवारी दोन दिवस त्यांची कसून चौकशी करण्यात आली. चोरलेला ऐवज कोठे ठेवला, कोणाला विकला यासंबंधी येथील गुन्हे शाखेच्या सहकार्याने चौकशी करण्यात आली. या प्रकरणात शहरातील ज्या तीन सराफांना दागिने विकले होते त्यांच्याकडून २० तोळे दागिने जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबंधित प्रकरणी केलेल्या चौकशीत सिमोगा जिल्ह्यात (कर्नाटक) श्री मल्लिकार्जुन देवस्थानची मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. लाखाहून अधिक भक्तगणांची गर्दी असते, या गर्दीचा लाभ उठवून तिमव्वा लक्ष्मण जाधव, मीना जाधव आणि उषा खांडेकर या महिलांना दागिने चोरताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडे कर्नाटक पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आजवर त्यांनी केलेले २४ गुन्हे उघडकीस आल्याचे सांगण्यात आले.
कर्नाटक न्यायालयातून या आरोपींविरुद्ध रिमांड घेऊन सोलापुरात आणले असता वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवारी सायंकाळी जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना घेऊन कर्नाटककडे रवाना झाले. उद्या या आरोपींना कर्नाटकच्या न्यायालयात उभे करण्यात येणार आहे. संबंधित तिमव्वा लक्ष्मण जाधव ही नगरसेवक लक्ष्मण जाधव यांची पत्नी असल्याचे सांगण्यात आले.