सोलापूर : प्रवाशांची मागणी व गर्दीचा प्रतिसाद पाहता रेल्वे प्रशासनाने कलबुर्गी-कोल्हापूर एक्सप्रेस सुरू केली आहे. ही गाडी आज १६ सप्टेंबर २०२२ पासून धावत असून ही गाडी सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूरमार्गे धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
या गाडीला शुक्रवार १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर ही गाडी कलबुर्गी येथून कोल्हापूरकडे रवाना झाली. तत्पुर्वी सोलापूर रेल्वे स्थानकावर या गाडीचे स्वागत करण्यात आले. खा. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवित सोलापूरहून कोल्हापूरकडे गाडी रवाना झाली.
या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री मुरुगेश निरानी, खासदार डॉ. उमेश जी. जाधव, आमदार दत्तात्रेय सी. पाटील उपस्थित होते. या नव्या गाडीमुळे सोलापूरहून कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. शिवाय व्यापारी, उद्योजकांना ही गाडी फायदेशीर ठरणार आहे.
---------
अशी आहे गाडीची वेळ...
दरम्यान, ही विशेष गाडी कलबुर्गी येथून १६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ११.१८ वाजता निघाली असून त्याच दिवशी ०६.३० वाजता कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे. त्यानंतर परत ही गाडी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून रात्री १०.१० वाजता निघणार असून पहाटे ३.२५ वाजता कलबुर्गी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर १७ सप्टेंबर २०२२ पासून नियमित ही गाडी कलबुर्गी येथून दररोज ६.४० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे त्याच दिवशी ०२.१५ वाजता पोहोचणार आहे. श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून दररोज ३ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १०.४५ वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.
----------
या ठिकाणी असणार थांबे
प्रवाशांची मागणी लक्षात घेता ही गाडी विशेष एक्सप्रेस गाडी म्हणून धावणार आहे. या गाडीला गाणगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूर, मिरज, जयसिंगपूर, हातकणंगले येथे थांबे असणार आहेत. या गाडीला १० द्वितीय श्रेणी आसन असणार असून त्यात २ आरक्षित व ८ अनारक्षित डबे असणार आहेत.