सोलापूर : नीलगार ज्ञातीसंस्था संचालित दक्षिण कालिका देवस्थानमच्या वतीने आषाढ मासात यंदाही वाराई नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या मासात १५ दिवसांत दररोज फळभाज्या अन् पालेभाज्यांनी देवीला अलंकृत केले जात असून सायंकाळी दीडशे भक्तांच्या उपस्थित सहस्त्रनामावली अर्चना होत आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसी रविवारी देवीला लिंबू अन् भेंडीने अलंकृत केले गेले.
१९६० साली समाजाची स्थापना झाली आणि २००२ पासून वर्षभरात चार नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. आषाढ मासातील वाराई नवरात्र महोत्सवला शनिवार, ६ जुलैपासून सुरुवात झाली. शनिवारी पहिल्या दिवशी गणपती पूजन आणि घटस्थापनेने आषाढ महोत्सवाला सुरुवात झाली. या काळात विविध पालेभाज्या अन् फळभाज्यांनी अलंकृत केले जात आहे. दररोज एका मानकरी भक्ताच्या देणगीतून देवीला पालेभाज्या अन् फळभाज्यांनी अलंकृत केले जात आहे. दुसऱ्या दिवसी सकाळी आरतीनंतर त्याच भाज्या देणगीदाराला देवीचा प्रसाद म्हणून दिला जातोय.
वर्षभरातील हे चारही उत्सव श्रीनिवास काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्रस्टी प्रमुख नारायण काळपगार, नीलगार ज्ञातीसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र चौडेकर आणि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सिद्राम कोनापुरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहेत.
वर्षभरात चार नवरात्रोत्सवदक्षिण कालिका देवस्थानमच्या वतीने वर्षभरात चार नवरात्रोत्सव धार्मिक कार्यक्रमांनी पार पाडला जातो. प्रथम चैत्री मासात चैत्री नवरात्र महोत्सव तर द्वितीय आषाढ मासात वाराई नवरात्र महोत्सव होतो. तृतीय अश्विन मासात अश्विन नवरात्र उत्सव आणि चतुर्थ पौष महिन्यात पौष शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. यंदा पालेभाज्यांची मंडईत आवक कमी प्रमाणात असल्याने पहिल्या दिवशी वांगी आणि काही अन्य फळभाज्यांनी देवीला अलंकृत करण्यात आले होते.