रेवणसिद्ध पुजारीउडगी : पारंपरिक पिकांना फाटा देत एका तरुणाने चार एकर माळरानावर ५८ दिवसात ९ लाख रुपयांचे कलिंगड पीक घेतले आहे़ लागवडीनंतर सलग १५ दिवस रासायनिक खतांची योग्य मात्रा देत आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जिद्द, चिकाटीने १०४ टन फळ घेण्याची किमया साधली आहे.
बसवराज कोळी (उडगी, ता. अक्कलकोट) असे त्या युवा जिद्दी शेतकºयाचे नाव आहे. प्रबळ इच्छाशक्ती अन् कृषी कर्तृत्वाच्या जोरावर आज कलिंगडाचा मास्टर म्हणून बसवराज यांची परिसरात ओळख निर्माण झाली आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या बसवराज यांच्या घरची परिस्थिती ही बेताचीच होती. त्यांना वडिलोपार्जित शेती आहे. शेतामध्ये पाण्याचे स्रोत नव्हते़ ५०० फूट खोल बोअर मारल्यानंतर दोन ते अडीच इंच पाणी लागले. या पाण्यावरच त्यांनी कलिंगडाची शेती फुलवली.
पहिल्या वर्षी ३ लाख, दुसºया वर्षी ४ लाख आणि तिसºया वर्षी ५८ दिवसांत विक्रमी ९ लाख ३६ हजार रुपये कलिंगड पिकाच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले आहे़ यावर्षी चार एकर क्षेत्रावर नांगरणी करून ६ फूट अंतराचे बेड तयार केले़ त्यावर मल्चिंग पेपर अंथरून ठिबक करून दीड फुटाच्या अंतराने कर्नाटक येथील ढुंगापूर (ता. आळंद) विजयालक्ष्मी नर्सरीतून २ रुपये ६० पैसे दराने शुगर क्वीन या वाणाची २० हजार ८०० रोपे आणून लावली. त्यानंतर ड्रिपद्वारे १९-१९ खताचा डोस एक दिवसाआड असे १५ दिवस देण्यात आला. ८ पोती डीएपी, ८ पोती निमपेंड, ४ पोती पोटारा, ४० किलो झिंग, ४० किलो फेरस, २० किलो पोरेट रासायनिक खते वापरली़ त्यानंतर आवश्यकतेनुसार १२६१, १३०४५, ०५२३४ खतांचा डोस दिला़ तसेच वेळोवेळी औषधांची फवारणी करून बागेची जोपासना केली.
गुजरातच्या बाजारपेठेत - ५८ दिवसांनंतर कलिंगडं विक्रीसाठी तयार झाली. थेट गुजरातच्या बाजारपेठेत मागणी झाली. विक्रीसाठी कलिंगडं ट्रकमधून पाठवण्यात आली. ९ रुपये दराने एकूण १०४ टन उत्पादन निघाले़ त्यापासून ९ लाख ३६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी २ लाख ६० हजार इतका खर्च केला आहे.
केवळ भावजी बसवराज टपाले यांच्याकडून अचूक व्यवस्थापनाचे तंत्र अवलंबले़ योग्य नियोजनाबरोबर मार्गदर्शनाने यावर्षी विक्रमी उत्पादन घेण्यात यश आले़ कलिगंड हे कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. आता लगेच बेड न बदलता त्यावरच पुन्हा एकदा कलिंगड लागवड करतोय. - बसवराज कोळी, कलिंगड उत्पादक, उडगी