आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये फळपीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी एका दिवसात जर ९० मिलिमीटर पाऊस झाला तर प्रति हेक्टरी तब्बल ६६ हजार रुपये मिळत होते. त्यात बदल करून सध्याच्या सरकारने रोज २५ मिलिमीटर सलग पाच दिवस पाऊस पडला तरच विम्याचा लाभ मिळेल, असे सांगितले. चार दिवस पाऊस पडला, शेवटच्या दिवशी पाऊस कमी पडला तर शेतकरी लाभापासून वंचित राहतील. फडणवीस सरकारच्या काळात २०१८ मध्ये ४२ कोटी तर २०१९ मध्ये ५४ कोटी रुपये फळपीकधारकांना विमा योजनेतून मिळालेले आहे. यावर्षी सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन महापूर आले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तब्बल ३१ हजार १५० फळपीक शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. तरीही या शेतकऱ्यांना शासनाने काढलेल्या जीआर मुळे फळपीक विमा मिळणार नाही. तरी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली.
तसेच अक्कलकोट तालुक्यात पशुधन अधिकाऱ्यांचा जागा आठ असून केवळ एकच डॉक्टर कार्यरत आहे. सहायक तीन असून सर्व जागा रिक्त आहे. दवाखाने १५ असून एकाही ठिकाणी डॉक्टर नाही. तालुक्यात १ लाख ४० लहानमोठे जनावरे असून वर्षाकाठी अनेक लहान जनावरे उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहेत, असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात ९९ टक्के पशुधन अधिकारी, कर्मचारी जागा भरलेले आहेत तर अक्कलकोट तालुक्यात ९९ टक्के रिक्त आहेत. असा भेदभाव का, असा सवाल उपस्थित करून त्वरित सर्व जागा भरण्याची मागणी केली.
अबू आझमीच्या विषयावर आक्षेप
दरम्यान, आमदार अबू आझमी यांनी बाबरी मशीद विषयावर आक्षेपार्ह प्रश्न उपस्थित केले होते. त्याबद्धल आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी हरकत घेत निषेध व्यक्त केला. तसेच पटलावरील हा विषय काढून टाकण्याची मागणी केली. त्यावेळी सभागृहात काहीवेळ गोंधळ उडाला होता.