कल्याणराव काळे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीअगोदर सहकारी संस्था अडचणीत असल्याने सत्ताधारी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. काळेंचे दोन साखर कारखाने, शिक्षण संस्था, बँका, पतसंस्था असा मोठा परिवार आहे. त्यानंतर भाजपाने त्यांना अर्थसहाय्यासाठी मदत करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्यानंतरच्या काळात भाजपने ते आश्वासन पाळले नाही म्हणून ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेटीगाठी समोर येत असल्याने ते राष्ट्रवादीत जाण्याची चर्चाही होती. पोटनिवडणुकीतील उमेदवार फायनल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील संपर्क कार्यालयात त्यांच्या समर्थक, साखर कारखान्याचे संचालक, प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मते जाणून घेतली. त्यात बहूतांश कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा कौल दिल्याने पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा प्रचार करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
शिंदे-काळे यांची फार्महाऊसवर चर्चा
पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जलसंपदामंत्री जयंत पाटील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी पंढरपुरात आले होते. त्यावेळी काळेंच्या आढीव येथील फार्महाऊसवर जयंत पाटील दुपारी भोजनासाठी जाणार याबाबतही चर्चा रंगल्या होत्या. मात्र तसे न होता करमाळ्याचे आ. संजय शिंदे व कल्याणराव काळे यांच्यात आढीवच्या फार्महाऊसवर भेट झाली. तेथे काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चाही झाली. त्यानुसार काळे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या प्रचारात सामील होतील, असे सांगण्यात येत आहे.
कोट ::::::::::::::::::::::::::::
आमदार संजय शिंदे कुर्डूवाडी-पंढरपूर रस्त्याने येत होते. त्यामुळे ते आढीवच्या फार्महाऊसवर चहापाण्यासाठी थांबले होते. त्याठिकाणी त्यांच्यासोबत काही विषयावर चर्चा झाली. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांशी आणखी चर्चा झाल्यानंतर आमचा निर्णय जाहीर करू. याबाबत कार्यकर्त्यांची मते घेतली आहेत.
- कल्याणराव काळे, अध्यक्ष, सहकार शिरोमणी