सलग तीन दिवस करकंब ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांची तपासणी करत असताना दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढत आहे.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलून संसर्ग रोखण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणे अपेक्षित आहे. परंतु याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून न राहता स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.
कोरोना रुग्णांचा वाढत असलेल्या आकड्याचा ग्राम समितीने गांभीर्याने विचार करून शनिवार आणि रविवार रुग्णालये आणि मेडिकल वगळता संपूर्ण गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दर्शवत दुकाने बंद ठेवली. यापुढेही कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.
सोमवारी करकंबमध्ये बैठक
करकंबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी कोरोना ग्राम समितीच्या वतीने बैठक आयोजित केली आहे. ही बैठक पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल आदींच्या उपस्थितीत घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे कोरोना ग्राम समितीच्या वतीने सांगण्यात आले.