करमाळा : करमाळा-कोर्टी या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. लांब अंतरावर रस्ता खोदला गेला आहे. जवळपास १२ दिवसांनंतरही तो बुजवलेला नाही. या रस्त्यावर गेल्या तीन महिन्यांत तीन जणांनी स्वत:चा प्राण गमावला आहे. या रस्त्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन काम करून घ्यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.
उस्मानाबाद-पाटस रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. सध्या करमाळा-कोर्टी या २० कि.मी. अंतरावर काम सुरू आहे. हे काम करत असताना संबंधित ठेकेदाराने एका बाजूची साइड पट्टी व रस्ता उखडून ठेवला आहे. खोदलेला रस्ता व मूळ डांबरी रस्ता यात साधारणत: तीन-चार फुटांचे अंतर आहे. या रस्त्यावर सध्या वाहने लावली तर समोरासमोर धडकतात. रस्त्याच्या कडेला झाडे आहेत. ती तशीच ठेवून दोन झाडांच्या मधील माती काढत आहेत. झाडे पडून अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात दिवेगव्हाण येथील बाळकृष्ण सोनवणे हे या रस्त्यावरून जात असताना संबंधित कंपनीचा रोड रोलर आडवा आला. या वेळी दुसऱ्या बाजूला उतरण्यास जागा नसल्याने बाळकृष्ण यांचे वाहन रोड रोलरला धडकून मरण पावले. राजूर येथील बाळासाहेब टापरे यांचा समोरून येणाऱ्या उसाच्या वाहनाला धडकून जागीच मृत्यू झाला.
---
वीट, विहाळ, कोर्टी या भागातील लोकांनी तक्रारी करूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी लक्ष देत नाहीत. वाहने सावकाश हाकण्याबाबत कोणताही सूचना फलक येथे लावलेला नाही. या रस्त्यावरून दररोज जवळपास ७०० ट्रॅक्टर धावतात.
- ॲड. प्रमोद जाधव
--
रस्त्याच्या साइड पट्टी खोदत असताना एक धोकादायक फलक लावून तेथे कामगार नेमत आहोत. तसेच खोदलेल्या साइड पट्ट्यांत लवकरच मुरूम टाकून त्या बुजवाव्यात, अशा सूचना ठेकेदारांना दिल्या आहेत.
- दिलीप वाघ
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
---
फोटो : २७ करमाळा रोड
करमाळा-कोर्टी रस्ता असा धोकादायक पद्धतीने खोदण्यात आला आहे.