करमाळा : महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे व लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा दुर्दैवी प्रकार सुरू आहे. या भागातील शेतकरी जेवढा सहनशील आहे तेवढा आक्रमक आहे. पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. आठ दिवसांत आठ तास पूर्ण दाबाने वीजपुरवाठा करा, अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांवर नुकसानभरपाईचा दावा दाखल करू असा इशारा शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहूराव फरतडे यांनी महावितरणला दिला आहे.
गेल्या महिन्यापासून पूर्व भागातील सीना कोळेगाव धरणावर अवलंबून असलेल्या कोळगाव, हिवरे, निमगाव, गौंडरे, आवाटी, सालसे, हिसरे या भागात महावितरणने वसुली मोहीम राबविली. प्रत्येक रोहित्रावर (डीपी) ५० हजारपासून लाख रुपयांपर्यंत वसुली केली. वीजपुरवठा करीत असताना मात्र महावितरणने आडमुठी भूमिका घेतली.
तालुक्यात पश्चिम भागातील शेतकरी उजनी व पूर्व भागात सीना कोळेगाव, धरणावर अवलंबून आहेत. मात्र, प्रत्येकवेळी पूर्व भागावर अन्याय होत आहे. पश्चिम भागात पूर्ण दाबाने आठ तास वीजपुरवठा होत आहे, तर पूर्व भागात मात्र अवघे चार तास वीजपुरवठा केला जात आहे. शेतकरी महावितरणच्या मनमानी कारभारामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
सध्या अनेक रोहित्रावर अतिरिक्त भार असल्याने रोहित्र जळत आहेत. अतिरिक्त भार झालेल्या डीपींचे सर्व्हे करून शेतकऱ्यांना तत्काळ अतिरिक्त डीपी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी फरतडे यांनी केली आहे.