सोलापूर : औज बंधा-यातून कर्नाटकातील शेतक-यांनी बेसुमार पाणी उपसा सुरू केल्याचे चित्र आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. याबाबत विजयपूर जिल्हाधिकाºयांना पत्र देणार असल्याचे आयुक्त ढाकणे यांनी सांगितले.
उजनीतून सोडलेल्या पाण्याने औज व चिंचपूर बंधारे साडेचार मीटर क्षमतेने भरले आहेत. यामुळे सोलापूरच्या दोन महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. पण कर्नाटकातील शेतक-यांनी बंधा-यातील पाण्याचा बेसुमार उपसा सुरू केल्याने बंधाºयातील पाणी दहा दिवस आधी संपेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याची माहिती मिळताच आयुक्त डॉ. ढाकणे यांनी औज बंधा-यास भेट दिली. त्यावेळी कर्नाटक भागातील शेतकरी मोठ्या संख्येने पंप लावून बंधा-यातील पाण्याचा उपसा करीत असल्याचे आढळले. बंधा-याचे पात्र जवळजवळ सहा किलोमीटर परिसरात आहे. इतक्या प्रमाणातील पंपाची संख्या लक्षात घेता बंधा-यातील पाण्याची पातळी दररोज वेगाने खाली जात आहे.
औज बंधा-याचे एका काठावर कर्नाटक व दुसरे काठ महाराष्ट्रात आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या शेतकºयांना फक्त दोन तास वीजपुरवठा दिला जात आहे. पण कर्नाटकात १२ तास वीजपुरवठा आहे. अशात शेतकरी ट्रॅक्टर, डिझेल इंजिन, जनरेटरचा वापर करून २४ तास पाण्याचा उपसा करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बेसुमार पाणी उपसा थांबविण्यासाठी विजयपूरच्या जिल्हाधिका-यांना पत्र देण्याचा सूचना सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांना दिल्या. चिंचपूर बंधा-याची हीच स्थिती असल्याचे लक्षात आले. त्यामुळे चिंचपूर बंधा-यातील पाणी खाली जाईल तसे औज बंधाºयातील पाणी या बंधा-यात घेण्यात येणार आहे. परतीच्या मार्गावर सोरेगाव ते टाकळी मार्गावरील जलवाहिनीची आयुक्तांनी पाहणी केली. हत्तूरजवळ या जलवाहिनीला मोठी गळती होत आहे. दोन ठिकाणच्या गळतीतून दररोज सुमारे दीड लाख लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून आले. ही गळती थांबविण्यासाठी २२ एप्रिलनंतर टाकळी जलवाहिनीवर शटडाऊन घ्या अशी सूचना आयुक्त डॉ. ढाकणे यांनी केली.
एमआयडीसीसाठी दरवाढ अटळ- औज बंधा-यासाठी उजनीतून सोडलेल्या पाण्याचे अवाजवी बिल आकारत पाटबंधारे खात्याने मनपाची ५१ कोटींची थकबाकी दाखविली आहे. थकबाकीबाबत बोलताना आयुक्त ढाकणे यांनी केवळ दोन बंधाºयात साठा करून दिलेल्या पाण्याचे बिल मनपाला लागू होते. त्याप्रमाणे बिल भरले जात आहे. यापूर्वी भरलेल्या बिलाची ११ कोटींची जादा रक्कम पाटबंधारे खात्याकडे आहे. यातून या पाण्याचे बिल वजा करावे असे कळविले आहे. शासनाने उद्योगाला देण्यात येणाºया कच्च्या पाण्याचे दर वाढविले आहेत. त्यामुळे चिंचोळी व अक्कलकोट रोड एमआयडीसीला देण्यात येणाºया पाणी बिलात वाढ करावी लागणार आहे.