सोलापूर: एसटी विभागाचे अधिकारी रोज तीन वेळा कर्नाटकपोलिसांना फोन करून सोलापुरातील एसटी गाड्या कर्नाटक हद्दीत सोडण्यासंदर्भात विचारणा करीत आहेत. यास कर्नाटक पोलिसांकडून नकारात्मक उत्तर मिळत आहे. एसटी गाड्या पाठवायच्या असल्यास तुमच्या जिम्मेदारीवर पाठवा, असे कर्नाटक पोलिस सांगत आहेत. तर इकडे तोट्यात असलेली एसटी महामंडळ एसटी गाड्यांच्या नुकसानीला घाबरत आहे. त्यामुळे सोलापूर हद्दीतून कर्नाटक हद्दीत जाणाऱ्या महाराष्ट्रातील एसटी गाड्या रोखल्या आहेत. यामुळे हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
सोलापुरातून कर्नाटकात गेलेल्या दोन एसटी गाड्यांना कन्नड भाषिकांनी दोन दिवसांपूर्वी काळा रंग लावला आहे. गाणगापूरजवळील अफजलपूर बस डेपो परिसरात ही घटना घडली आहे. सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला असून दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात तणाव स्थिती आहे. एसटी गाड्यांचे नुकसान होण्याची भीती कर्नाटक पोलिसांनी व्यक्त केली आहे. कर्नाटक हद्दीत गाड्या पाठवू नका, अशी सक्त सूचना कन्नड पोलिसांनी केली आहे. त्यामुळे सोलापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या सत्तर गाड्या तसेच कर्नाटकमधून सोलापुरात येणाऱ्या सत्तर गाड्या अशा एकूण १४० चाळीस गाड्यांचा रोजचा प्रवास थांबला आहे.