सोलापूर : कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी आवश्यक असणाºया ऑक्सिजनसाठी सोलापूरला पुण्याच्या कंपन्यांच्या भरवशावर रहावे लागणार आहे. कर्नाटकातील कंपन्यांनी भाव दुप्पट केल्याने हॉस्पिटल प्रशासनाची अडचण झाली आहे. त्यामुळे भविष्यात मागणी वाढल्यास तेथूनच ऑक्सिजन उपलब्ध करावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विभागीय आयुक्तांकडे दिला आहे.
कोरोना साथीमुळे शहरातील हॉस्पिटलमधून ऑक्सिजनची मागणी दुपटीने वाढली आहे. मुंबईत ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्याच्या घटनेने राज्यातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समिती नियुक्त केली आहे. या समितीची शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांच्या कक्षात बैठक झाली. ऑक्सिजन उत्पादक व साठा करणारे चिंचोळी एमआयडीसीतील अर्निकेम इंडस्ट्रीज, एल. आर. इंडस्ट्रीज व टेंभुर्णीतील एस. एस. बॅग्ज हे तीन कारखाने आहेत. या कारखान्यांना पुण्यातून कच्चा माल मिळतो. टेंभुर्णीतील कारखाना बंद होता, तो आता सुरू करण्यात येत आहे. शहरातील हॉस्पिटलना साथ सुरू झाल्यावर दुप्पट आॅक्सिजन लागत आहे. काही जण कर्नाटकातील बेल्लारी येथून ऑक्सिजन मागवत होते, पण तेथील कंपन्यांनी दर १२ वरून २४ रुपये किलो केल्याने पुरवठा बंद करण्यात आल्याचे रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर भविष्यात रुग्ण वाढल्यास ऑक्सिजनची गरज आणखी वाढणार आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहता पुण्यातील तीन कंपन्यांकडून सोलापूरला जादा ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा, याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला असल्याचे सांगण्यात आले. बैठकीला जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, बी. टी. यशवंते, सोरसे, नामदेव भालेराव, कोलम, राहुल आराध्ये आदी उपस्थित होते.
सध्या पुरेसा साठासद्यस्थितीत सोलापुरातील सर्व हॉस्पिटलना ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. टंचाई भासू नये म्हणून औद्योगिक विभागाला लागणारा आॅक्सिजन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, चिंचोळी एमआयडीसी व मुरबाडहून आॅक्सिजन उपलब्ध होत आहे. आणखी खासगी उद्योजकांना आॅक्सिजन निर्मितीसाठी साह्य करण्यात येणार आहे.