सोलापूर: दरवर्षी एप्रिल महिना उजाडला की, उन्हाची तिरीप दिवसेंदिवस वाढत जाते आणि मे असह्य तापमानाच्या पार्याने प्रत्येकाची त्राही त्राही भगवान अशी स्थिती होते. यंदा त्याहून अधिक स्थिती पहावयास मिळू लागली आहे. दुपारपर्यंत रणरणते ऊन आणि त्यानंतर वादळाचा प्रकोप या निसर्गाच्या लहरीपणामुळे वादळ, वारे, गारपिटीच्या त्रासाने शहर आणि जिल्ह्यातील जनता या दोन्हीच्या कात्रीत सापडली आहे. सोलापूरच्या इतिहासात एप्रिलच्या प्रारंभापासूनच रणरणत्या उन्हाच्या झळा जाणवण्यास सुरु होते. गेल्या पंचवीस वर्षांच्या तापमानाच्या नोंदीकडे लक्ष वेधले तर आठ वेळा ४४ अं. से. तर १२ वेळा तापमानाचा पारा ४३ अं.से. च्या पुढे सरकला आहे. २७ वर्षांपूर्वी ६ जून १९८८ साली सोलापूरच्या इतिहासात आजवरचे विक्रमी ४६ अं. से. तापमान नोंदले गेले, त्यानंतर २० मे २००५ साली त्या खालोखाल ४५.१ अं. से. तापपान नोंदले गेले. सातत्याने ४३ अं.से. च्या पुढे असणार्या तापमानाच्या पार्यामुळे दरवर्षी सोलापूर जिल्ह्याला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पर्यायाने टँकर मागणीचे भोग आजही संपलेले नाहीत. यंदा मार्चच्या प्रारंभापासून तापमानाचा पारा एकेक अंशाने पुढे सरकत उन्हाची तीव्रता जाणवत होती. मध्येच गारपिटीने पारा कमी झाला़ आता ३१ मार्चला चाळिशी पार करीत ४१.१ तापमान नोंदले गेले. एप्रिलच्या ४, ५, ६, ७, २४ या तारखांना पारा ४१ अंशांच्या पुढेच राहिला आहे. २५ एप्रिलला त्यात वाढ होऊन तो ४२.३ अंशांवर पोहोचला. मे महिन्यात २५ मे रोजी त्यात या वर्षातले उच्चांकी ४३.५ तापमानाच्या झळा सोलापूरकरांनी अनुभवल्या. सोलापूरचे आजवरचे उच्चांकी तापमान जरी ४६ आणि ४५.१ अं. से. असले तरी यंदा त्या तीव्रतेने उच्चांकी तापमान जाणवले. त्याचे कारण असे की, दुपारपर्यंत रणरणत्या उन्हांनी शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते निर्मनुष्य भासत होते. त्यानंतर वादळी वार्यासह होणार्या पावसामुळे सरासरी तापमानामध्ये घट होऊन पारा ४२, ४३ अंशांवर येऊन स्थिर व्हायचा. वास्तविक दुपारपर्यंतचे तापमान उच्चांकी असायचे. गेल्या चार दिवसांपासून वादळी वार्यांमुळे तापमानाचा पारा खाली आला असला तरी मे महिन्याच्या प्रारंभापासून वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शहर आणि ग्रामीण भागातील जनतेला असह्य उन्हाच्या झळांनी अस्वस्थ केले. हॉस्पिटलमधील नवजात शिशू आणि वृद्धांना याची मोठ्या प्रमाणात झळ बसली. एकूणच दरवर्षीपेक्षा यंदा तीव्र उन्हाच्या झळा आणि वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे जनतेला अस्वस्थ करुन सोडले आहे.
-------------------------------------
अशा घेतल्या जातात तापमानाच्या नोंदी
थर्मामीटर (तापमापक): चालू तापमान किती आहे हे पाहावयास मिळते. या तापमापकात पार्याचा वापर केला जातो. वेट बल्ब थर्मामीटर (आर्द्रता मापक): याचा हवेतील बाष्पाचे प्रमाण समजण्यासाठी वापर केला जातो. मॅक्झिमम थर्मामीटर (कमाल तापमापक): यामध्ये दिवस- रात्रभरातील जास्तीत जास्त तापमानाची नोंद होते. ती दररोज सायंकाळी ५.३० वाजता घेतली जाते. किमान तापमापक: या तापमापकाद्वारे कमीत कमी तापमानाची नोंद होते. ही नोंद दररोज सकाळी ८.३० वाजता घेतली जाते. वातदिशादर्शक यंत्राद्वारे वार्याची दिशा आणि तो कोणत्या दिशेने जास्त आहे हे समजते तर पॅरामीटरद्वारे हवेचा दाब मोजला जातो. हायग्रोग्राफ : यामध्ये २४ तास हवेतील बाष्पाचे (आर्द्रतेचे) प्रमाण किती होते याची नोंद होते. थर्मोग्राफद्वारे २४ तास तापमानाची नोंद होत राहते. त्यात ठराविक वेळेला किती तापमान होते हे समजण्यास सुलभ होते.