बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी माजी खासदार धर्मण्णा सादूल यांना फोन करून त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात येण्याचे निमंत्रण दिले. केसीआर यांच्याकडून निमंत्रण आल्यानंतर सादूल हे काहीसे चकित झाले. त्यांनी लगेच नकारदेखील कळविला. फोनवर सादूल म्हणाले, काँग्रेस पक्षाने मला भरपूर काही दिले असून, पक्ष हाच माझा खरा धर्म आहे. त्यामुळे मी तुमच्या पक्षात येणार नाही, असे बोलल्यानंतर केसीआर यांनी लगेच फोन ठेवला.
केसीआर सध्या भारत राष्ट्र समितीद्वारे नव्या नेत्यांना जोडत आहेत. त्यांचे लक्ष महाराष्ट्राकडे असून, मागील महिन्यात त्यांनी नांदेड येथे विराट सभा घेतली. पुढील वर्षी होऊ घातलेली लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील आजी-माजी खासदार, तसेच आमदारांना त्यांच्या पक्षात येण्याचे निमंत्रण देत आहेत. काही दिवसांपूर्वी केसीआर यांचे निकटवर्तीय असलेले रेड्डी नामक माजी खासदाराने धर्मण्णा यांना फोन केला. त्यांच्यासोबत केसीआर बोलणार असल्याची माहिती दिली.
‘केसीआर’ यांनी माजी खासदारांच्या सूचनेनंतर दहा मिनिटांनी फोन करून आधी सादूल यांची विचारपूस केली. धर्मण्णा कसे आहात, काय करत आहात, अशी विचारणा केली. सादूल यांनीदेखील त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर केसीआर यांनी सादूल यांना भारत राष्ट्र समितीत येण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे सादूल काहीसे अवाक् झाले. काँग्रेस पक्ष सोडता येत नसल्याचे त्यांना स्पष्ट केले. त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंतीदेखील केसीआर यांनी केल्याची माहिती सादूल यांनी दिली.