सुजल पाटील
सोलापूर : देशातील वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागणार, अशी भीती निर्माण झाली आहे. प्रदूषण अन् इंधनाची अतिरिक्त गरज या प्रमुख समस्यांना देशाला सामोरे जावे लागणार आहे. यापार्श्वभूमीवर इंधनाची बचत व्हावी त्याचबरोबर पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या नववीत शिकणाºया केदार कामतकर या विद्यार्थ्याने भन्नाट कल्पनेतून उपकरण तयार केले आहे़ त्या उपकरणाचे नाव आहे ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स फॉर सेव्हिंग फ्युएल’.
देशात रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे़ दिवसेंदिवस वाहनांची संख्या देखील वाढत आहे़ त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे़ अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यावर अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर्स तयार केले आहेत़ आता या स्पीड ब्रेकर्समुळे सुध्दा अपघात होत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे़ भारतात अनेक शाळा, महाविद्यालये रस्त्यांच्या कडेला असतात़ शाळा परिसरात कायमस्वरूपी स्पीड ब्रेकर्स तयार करण्यात आले आहेत.
ज्यावेळी शाळा, कॉलेज बंद असतात त्यावेळी वाहनांना स्पीड ब्रेकर्समुळे वेग कमी करावा लागतो, त्यामुळे जास्तीच्या इंधनाचे ज्वलन होऊन वातावरणात धूर सोडला जातो अन् साहजिकच प्रदूषण होते़ हे होऊ नये म्हणून जेव्हा शाळा, कॉलेज बंद असतात तेव्हा ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स जागच्या जागी फिरतात आणि त्यापासून सरळ रस्ता तयार होतो़ त्यामुळे वाहनांना आपला वेग कमी करावा लागत नाही परिणामी इंधनाची बचत होऊन धूर न झाल्याने प्रदूषण कमी होते, अशी माहिती उपकरण बनविणारा विद्यार्थी केदार कामतकर याने सांगितले़
जिल्हा़... राज्य अन् आता राष्ट्रीय पातळीवऱ...- हरिभाई देवकरण प्रशालेचा विद्यार्थी केदार कामतकर याने तयार केलेले ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स फॉर सेव्हिंग फ्युएल’ हे उपकरण जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट ठरले. त्यानंतर सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञ महाविद्यालय, अमरावती व नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अॅवॉर्ड विज्ञान प्रदर्शनातही यशस्वी ठरल्याने त्याची दिल्ली येथे देशपातळीवर होणाºया प्रदर्शनासाठी निवड झाली़ या उपक्रमाचे कौतुक राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह मार्गदर्शक विज्ञान शिक्षक गौतम कांबळे, शहाणे, कलाशिक्षक कोरवलीकर, मुख्याध्यापक पी़ जी़ चव्हाण, शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांनी केले़
मी तयार केलेल्या ‘मूव्हेबल स्पीड ब्रेकर्स फॉर सेव्हिंग फ्युएल’ या वैज्ञानिक उपकरणामुळे वाहनांचे इंधन व वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे़ शासनाने अशाप्रकारचे स्पीड ब्रेकर तयार केल्यास प्रदूषण थांबण्यास मदत होईल, तसेच इंधनाची फार मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे़ भविष्यात निर्माण होणारा इंधन तुटवडा व वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागू नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाने या उपकरणाची दखल घ्यावी़- केदार मनोज कामतकर, विद्यार्थी, हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर