जगन्नाथ हुक्केरी
सोलापूर : आध्यात्मिक शिक्षण व धार्मिकतेच्या बळावर डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी गौडगाव बु।। मठाचे मठाधिश झाले. त्यानंतर त्यांना केदार पीठाचे जगद्गुरू होण्याची संधीही मिळाली, मात्र माशी कुठे शिंकली काय माहीत त्यांना जगद्गुरू होता आले नाही. यंदा मात्र जनाधाराच्या बळावर ते खासदार होऊन संसदेत पोहोचले.
जन्मल्यापासूनच अध्यात्माकडे ओढ. मुलगा मोठा महास्वामी व्हावा आणि धार्मिक भाव समाजामध्ये पेरावा, अशी वडिलांचीही इच्छा. त्यात गुरू व समाजाने दिलेले प्रोत्साहन. काशी येथील शिक्षण. प्रचंड वाचन, सुरुवातीपासून त्यागी वृत्ती व वैराग्य भाव, बालवयापासूनच तपश्चर्या, अनुष्ठान, मौन पाळण्याच्या अंगी बाळगलेल्या नियमामुळे महास्वामी म्हणून त्यांच्याकडे बघण्याची समाजाची दृष्टी झाली. त्यात संस्कृत, कन्नड, हिंदीतील श्लोकावर प्रभुत्व असल्याने चपखल भाषणबाजी, प्रवचन व आशीर्वचन करण्याची कला प्राप्त झाली. हे नागरिकांना खूप भावू लागले. त्यातूनच ते प्रवचनकार म्हणून पुढे आले. अशात गौडगाव बु।। (ता. अक्कलकोट) येथील श्री गुरू सिद्धमल्लेश्वर मठाचे मठाधिश झाले. गौडगाव मठाचे मठाधिश होणे व या मठाचा पट्टाभिषेक होणे, हे पूर्वनियोजित होते. मात्र त्यांच्या अध्यात्मातील प्रभावामुळे काही महास्वामींनी त्यांना जगद्गुरू बनविण्याच्या रेसमध्ये आणले. सगळ्यांची सहमतीही मिळाली. पट्टाभिषेकाची तयारीही सुरू झाली, मात्र पुढे जे घडले ते सगळे अघटितच होते.
२००० साली केदार जगद्गुरू होण्यात त्यांना ‘राज’कारण आडवे आले. सुरुवातीला पाठिंबा देणाºया महास्वामी अन् शिवाचार्य मंडळींचा विरोध झाला. ते या शर्यतीतून मागे पडले. त्यानंतर निराश न होता अध्यात्माबरोबरच सामाजिक कार्यास त्यांनी वाहून घेतले.
कृषी, शिक्षण, क्रीडाबरोबरच भाषाशुद्धीसाठी वाचन, पाठांतर स्पर्धा घेऊन भावी पिढी सक्षम करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यश मिळत गेले. सुरुवातीला राजकारण नको म्हटले असले तरी नंतर पक्ष आणि सहकाºयांचा आग्रह त्यांना झिडकारता आला नाही. यामुळे राजकारणात प्रवेश, भाजपचे सदस्यत्व, अर्ज भरणे या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. निवडणुकीत त्यांना मोठा जनाधार मिळाला व अनेक संधीने हुलकावणी देऊनही अखेर गौडगाव मठाचे मठाधिपती सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बनून संसदेत निघाले आहेत.
माणूर मठाचीही हुलकावणी- मराठवाड्यातील माणूर येथील मठ आध्यात्मिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. या मठाचे मठाधिश म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींची वर्णी लागली होती, मात्र तेथील संधीनेही त्यांना अनपेक्षितपणे हुलकावणी दिली. तेथे ते फार काळ राहू शकले नाहीत. त्यानंतर शेळगी येथे मठ सुरू करून आध्यात्मिक कार्य त्यांनी सुरू ठेवले.