शहाजी फुरडे पाटील
सोलापूर/बार्शी : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या भावात थोडेसे चढ-उतार होत आहेत. सध्या सराफा बाजारात सोन्याचे भाव अस्थिर होते. जर तुम्ही खूप दिवसांपासून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे. कारण गुरुवारीही सोन्याच्या भावात काहीशी घसरण पाहायला मिळाली. याशिवाय सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त दरात उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात, गुरुवारी सोन्याचा भाव स्थिर होता ज्याला यूएस ट्रेझरी उत्पन्नातील पुलबॅकमुळे पाठिंबा मिळाला, मात्र डॉलरच्या कमी जास्त किमतीमुळे दरातही चढउतार होतात.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्याची भूमिका मवाळ होण्याच्या अपेक्षेने सोन्याचे भाव कमी झाले आहेत. जेव्हा डॉलरचे मूल्य कमी होईल, महागाई कमी होईल आणि रशिया-युक्रेन युद्ध संपेल तेव्हाच सोन्याचे भाव वाढतील. युरोपमध्ये अनेक महिने चाललेल्या युद्धामुळे सप्लाय चेनच्या समस्या आणि चलन अस्थिरता निर्माण झाली आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव
सध्या बार्शीत २४ कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ५१,४३० रुपये होता. काही दिवसांपूर्वी सोन्याचा भाव ५१,४४० रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता.
विक्रमी उच्च दरापेक्षा सोने किती स्वस्त
आजच्या २४ कॅरेट सोन्याच्या किमतीवर नजर टाकली तर, सोनं त्याच्या सर्वकालीन विक्रमी किमतीपेक्षा खूपच स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट २०२० मध्ये २४ कॅरेट सोन्याने ५५,४०० रुपये प्रति दहा ग्रॅम हा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. आजच्या दराची या दराशी तुलना केल्यास आज सोन्याच्या भावात ३,९७० रुपयांची घसरण झाली आहे.
मागील काही दिवसात मागणी कमी असल्याने दर काहीसे उतरले होते. आता सणासुदीचे दिवस सुरू होतील. रक्षाबंधन जवळ आले आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कमी होणार नाही. ग्राहक सोन्यामध्ये अधिकाधिक गुंतवणूक करतील. मागणी कायम राहील त्यामुळे दर उतरणार नाहीत.- चेतन कोठारी, सराफा व्यावसायिक, बार्शी