तरंगेवाडी(ता. सांगोला) येथील सांगोलकर-गवळीवस्ती या डिजिटल जंगल क्लासरूम या शाळेस मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, गटविकास अधिकारी संतोष राऊत, गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता इरफान इनामदार, सर फाउंडेशनचे मुख्य समन्वयक सिद्धाराम मासाळे, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर व तंत्रनिहाय शिक्षक खुशालउद्दीन शेख आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी झूम मिटींगव्दारे जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षकांशी जंगल क्लासरूम व सध्याच्या शाळा स्थितीबाबतची भूमिका मांडली. विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
शेख गुरुजींच्या रूपाने आम्हाला आधुनिक शिक्षकच भेटला आहे. यांचे हे कार्य जिल्ह्याला प्रेरणादायी आहे. आज त्यांच्या नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रात आम्हाला पाहावयास मिळत आहेत. त्यांनी माळशिरस तालुक्यातील पिलीव येथेही याच प्रकारचे काम केले आहे. ते तंत्रनिहाय शिक्षक असून, अनेक शिक्षकांचे ते मार्गदर्शकही आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय राठोड म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण कार्यालयातील विस्तार अधिकारी स्वामी, सांगोलकर-गवळीवस्ती शाळेचे मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी, सुशांत शिंत्रे, श्रीमंत गावडे, केंद्रप्रमुख मनोहर इंगोले, शरद खताळ, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष सुभाष तळे, जवळा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या.
चार लाखांची केली पदरमोड
स्वच्छ शाळा, सुंदर शाळा हे अभियान मी आता सुरू केले आहे. या अगोदरच तरंगेवाडी (ता. सांगोला) येथील शिक्षक खुशालउद्दीन शेख यांनी आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन हे शिक्षण सर्व घटकांपर्यंत पोहोचवले आहे. आज यांनी पदरमोड करून ४ लाख रुपये खर्च करून जंगल शाळा तयार केली आहे. त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. आता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार आहेत. ज्या ठिकाणी कोविड नाही अशा गावांमध्ये ठराव करून या शाळा सुरूही होणार आहेत. गेल्या दीड वर्षापासून ज्ञानमंदिरे बंद आहेत. तरीही जिल्ह्यातील काही शाळांनी स्वच्छता मोहीम राबवून शाळा आधुनिक केल्या आहेत, असेही दिलीप स्वामी म्हणाले.
कोट ::::::::::::::
खडू, फळ्यावरच्या शाळेपेक्षा डिजिटल पद्धतीने शाळा शिकविणे, याची मला पहिल्यापासून आवड आहे. गेली दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण खोळंबले होते. ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नव्हते. अशा ८ विद्यार्थ्यांना मी माझ्या स्वत:च्या खर्चातून मोबाईल दिले. आज आमच्या या शाळेमध्ये ६२ विद्यार्थी आहेत. ही जंगल क्लासरूम करताना मला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. तरीही मी हे सर्व यशस्वी करून दाखविले.
- खुशालउद्दीन शेख
डिजिटल जंगल शाळेचे निर्माते
फोटो ओळ :::::::::::::::::::
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी तरंगेवाडी येथील सांगोलकर गवळीवस्ती डिजिटल जंगल क्लासरुमला भेट दिली.