करमाळा : केम रेल्वे पुलाखालील खड्डे व पाणी यामुळे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. रस्ता तात्पुरता दुरुस्त करून उड्डाण पूल बांधावा व केम रेल्वे स्टेशनवर हैदराबाद- मुंबई, चेन्नई- मुंबई या गाड्यांना कायमस्वरूपी थांबा देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन सोलापूर विभागाचे रेल प्रबंधक यांना प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले.
येथील रेल्वे पुला खालून करमाळा, कुर्डुवाडी, परांडा, बार्शी, रोपळे, साडे, वरकुटे, पाथुर्डी गावांकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावर वाहनांची सारखी वर्दळ असते. पावसाळा संपला तरी या नाल्यात पाणी आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. परिणामत: मोटारसायकली, टॅम्पो, कार अशा लहान गाड्या खड्ड्यात अडकतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. दुचाकीस्वारांचे अपघात होतात.
केममध्ये आसपासच्या भागातून शाळेसाठी येणारे विद्यार्थी नाल्यात पाणी असल्याने आपला जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडून ये-जा करतात. येथे कायम उड्डणपूल बांधावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने येत्या १५ दिवसांत याचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले आहे.
यामुळे २० गावांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. कोरोनाच्या काळात केम येथील मुंबई हैदराबाद या गाडीचा थांबा रद्द केला आहे. रेल्वे सुरळीत झाल्यावर या गाडीला थांबा देण्यात येईल व चेन्नई- मुंबई या गाडीला थांबा देण्याचे आश्वासन रेल्वे विभागाने शिष्टमंडाळास दिले. या शिष्टमंडळात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के- पाटील, सोलापूर शहर अध्यक्ष अजित कुलकणीं, कार्याध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते.
फोटो : २३ केम
केम रेल्वेपुलाखाली खड्डे व पाणी असल्याने दुचाकी पडून अपघात होतात.