समीर इनामदार
सोलापूर: इस्लाम धर्मातील प्रमुख मानलेल्या पाच गोष्टींमधील एक असलेल्या ‘जकात’मधून विविध कारणास्तव शाळा सोडणाºया मुलांना सोलापुरातील खादिमाने उर्दू फोरम या संस्थेने मदतीचा हात दिला. याद्वारे अनेकांना प्रमुख प्रवाहात आणण्याचे काम या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
इस्लाममध्ये प्रत्येक व्यक्तीवर जकात आवश्यक आहे, मात्र त्यासाठी तो श्रीमंत असणे आवश्यक आहे. जकात म्हणजे दान देणे, स्वच्छ करणे, वाढवणे. जकात दिल्याने आपल्या कारभारात वाढ होते, असे मानले जाते. रमजान महिन्यात गरीब, अनाथांना मदत करणे हे प्रमुख कर्तव्य मानले जाते. काही जण मशीद अथवा मदरशांमध्ये हे दान करतात. काही जण या पैशांमधून अधिकाधिक लोकांना मदत मिळेल अशी व्यवस्था करतात.
सोलापुरात मुस्लिमांमध्ये शाळा सोडणाºयांचे प्रमाण जवळपास ५० टक्क्यांपर्यंत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण शाळा सोडून मिळेल ते काम करतात. त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खादिमाने उर्दू फोरम या संस्थेने विडा उचलला. या संस्थेचे अध्यक्ष विकार अहमद शेख, खजिनदार नजीर मुन्शी, म. रफिक खान, डॉ. मो. शफी चोबदार आणि इतरांनी एकत्र येत या विषयावर काम करण्याचे ठरविले.
एनआयओएसच्या माध्यमातून २०१७-१८ साली १०० मुलांना दहावीसाठी प्रवेश दिला. यात ७१ जण परीक्षेस बसले आणि ४७ जण उत्तीर्ण झाले.
यातील ४० जणांना इलेक्ट्रीशिअनचा सहा महिन्यांचा मोफत कोर्स चालविण्यात आला. २०१८-१९ मध्ये एकूण ४२ जणांनी दहावीसाठी प्रवेश घेतला आहे. कोणत्याही वर्गातून शाळा सोडणाºया मुलांना यासाठी प्रवेश दिला जातो. यासाठी १४ वर्षे वयाची अट आहे. दर रविवारी यासाठी प्रशिक्षण दिले जाते. पुण्याच्या अँग्लो उर्दू हायस्कूलतर्फे प्रवेश देण्यात येतो.
दानशूर व्यक्ती आल्या पुढे- हा संपूर्ण खर्च नागरिकांनी दिलेल्या जकातमधून चालविण्यात येतो. मुस्लिमांमधील अनेक जण जकातच्या स्वरुपात या संघटनेस दान देतात. दरवर्षी मुलांची संख्या वाढते आहे. माध्यमिक स्तरावर शाळा सोडणाºया मुलांना यात प्रवेश दिला जातो. दरवर्षी जवळपास १६ लाख ५० हजार इतका खर्च यासाठी अपेक्षित आहे. समाजातील दानशूर व्यक्ती संघटनेला मदत करतात. त्यातूनच हा संपूर्ण खर्च उचलला जातो. एका चांगल्या कामासाठी हा पैसा खर्च होत असल्याने समाधान असल्याचे अध्यक्ष विकार अहमद शेख यांनी सांगितले.