सोलापूर: सरासरीच्या २६८ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेले खरीप वाया गेल्यात जमा असताना परतीच्या पावसानेही गुंगारा मारल्याने दरवर्षी १५ सप्टेंबरपासून सुरू होणारी रब्बी पेरणी यंदा सुरुच झाली नसल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले.
अत्यल्प पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील सर्वच पिके गेली आहेत. तसा अहवालही कृषी खात्याने वरिष्ठांना दिला आहे. जिल्ह्याचे खरीप पेरणीचे उद्दिष्ट ७९ हजार हेक्टर असताना दोन लाख १२ हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या; मात्र नंतर पाऊस गायब झाल्याने संपूर्ण खरीप पेर वाया गेली आहे. पाऊस नसल्याने खरिपाशिवाय ऊस, द्राक्ष, डाळिंब व अन्य पिकांवरही परिणाम झाला आहे. सोलापूर जिल्हा हा रब्बी असल्याने रब्बीचे क्षेत्र आठ लाख हेक्टरपर्यंत आहे; मात्र यावर्षी पावसाळ्यात व परतीचा पाऊसही नसल्याने रब्बी पेरणीला सुरुवातही झाली नाही.
जिल्ह्यात साधारण १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत ज्वारीची पेरणी केली जाते. पावसाच्या प्रमाणावर पेरणीचा कालावधी काही अंशी बदलतो; मात्र यावर्षी पाऊसच नसल्याने ज्वारीच्या पेरणीला सुरुवातही झाली नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातून सांगण्यात आले. मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ या तालुक्यात सप्टेंबर महिन्यातच ज्वारीची पेरणी केली जाते. गुरुवारपर्यंत या तालुक्यात पेरणी झाल्याची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.
पाऊस ४० टक्क्यांपर्यंतच..
दमदार पावसाची नक्षत्रे निघून गेली असून आतापर्यंत (गुरुवार दिनांक ४ आॅक्टोबर) ३९.७९ टक्के पाऊस पडला आहे. जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यात एकूण ५ हजार ३७७ मि. मी. तर सरासरी ४८८.८३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते. या कालावधीत प्रत्यक्षात एकूण २१४० मि.मी. व सरासरी १९४ मि.मी. पाऊस पडला आहे. बार्शी तालुक्यात ५९ टक्के, माळशिरस तालुक्यात ४७ टक्के तर अन्य सर्वच तालुक्यात ४० टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे.
पाऊस नसल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. कोणत्याही पिकांचे उत्पादन शेतकºयांच्या हाती लागण्याची शक्यता नाही. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाºयावरही परिणाम होणार आहे; मात्र मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेतला तर दिवाळीपर्यंतही पाऊस पडू शकतो.-बसवराज बिराजदार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
ऊस लागवडीवरही परिणामजिल्ह्यात जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत ऊस लागवडीची लगबग सुरू असते; मात्र यावर्षी पाऊस नसल्याने नवीन ऊस लागवडीवर परिणाम झाला आहे. उजनी धरणालगत काही भागात उसाची नव्याने लागवड झाली असल्याचे सांगण्यात आले; मात्र जिल्ह्याच्या इतर भागात सध्या असलेल्या उसाची वाढही चांगली झाली नाही.