सांगोला तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर मृग नक्षत्राचाही पाऊस झाला. सलग दोन वर्ष समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे खरिपाचे क्षेत्र वाढले आहे. कृषी विभागाकडून खरीप पिकांचे सुमारे ३१ हजार ५०४ हेक्टरवर नियोजन करून बियाणे व रासायनिक खते उपलब्ध करून दिली. आत्तापर्यंत झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीक पेरणीसाठी चाड्यावर मूठ धरल्याने सुमारे ४ हजार २१६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. जेथे दमदार पाऊस झाला तेथील शेतकऱ्यांनी वापसा येताच बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सूर्यफूल पेरणीला सुरुवात केली होती. तर ज्या भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही तेथे शेतकऱ्यांनी पेरणीला अद्याप सुरुवात केली नाही.
कोठेतरी कोसळतात पावसाच्या सरी
तालुका कृषी विभागाकडून यापूर्वीच खरीप हंगामासाठी सरासरी १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी वापसा येताच बाजरी, मका पीक पेरणीला सुरुवात करावी, असे आवाहन केले होते. तरीही शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून बाजरी, मका पेरणीसाठी घाई केल्याचे दिसून येत आहे. मृग नक्षत्र ८ जूनला निघाले खरे. या नक्षत्रात एक-दोन पाऊस वगळता पेरणीयोग्य पाऊस झालाच नाही. दररोज आकाशात ढगाळ वातावरण, मेघ दाटून येतात, कोठेतरी पावसाच्या सरीही कोसळतात. मात्र दमदार पाऊस काही केल्याने पडेना. दरम्यान, पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी चाड्यावरची मूठ पुन्हा रोखून धरली आहे.
कोट ::::::::::::::::
जेथे चांगला पाऊस पडला तेथे उगवण झालेल्या पिकांना किमान १५ दिवसतरी पाण्याची गरज भासणार नाही. परंतु जिथं ओल कमी असताना पेरणी झाली आहे, तेथे मात्र पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी घाई करू नये.
- रमेश भंडारे
प्रभारी तालुका कृषी अधिकारी
पेरणी झालेले क्षेत्र
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप बाजरी २६४०, मका १२३०, तूर ११५, उडीद ११७, मूग ६७, भुईमूग २७, सूर्यफूल ११२ असे एकूण ४२१६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केल्या आहेत.
मंडलनिहाय झालेला पाऊस
सांगोला तालुक्यातील नऊ मंडलमधील सांगोला (१०७.५), शिवणे (११५.८), जवळा (८८.८), हातीद (१२८.८), सोनंद (१०४), महूद (१८२), कोळा (१२८.८), नाझरे (१४८.९), संगेवाडी (१०८.७), तर सरासरी १२३.८० मि.मी. पाऊस झाला आहे.