सोलापूर : पाकणी येथून अपहरण केलेल्या सय्यद जीशान अली (वय ३७, रा. नाकोडा वॉटर टँकच्या बाजूला, पाकणी ) याची चोवीस तासांत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सुटका केली. त्याची कर्नाटकातील कलबुर्गी येथून सुटका करण्यात आली. या प्रकरणातील तीन आरोपींना कारसह ताब्यात घेण्यात आले.
सय्यद अली हा मूळ मध्य प्रदेशचा. तो सोलापुरात कामासाठी राहत होता. त्याने फिर्यादी जावेद सय्यद अली ( वय ४०, रा. हैदराबाद ) यांना फोन करून पैशांची मागणी केली. अकांऊटवर ३ लाख ८० हजार रुपये पाठवून दे, पैसे अकांऊटवर जमा केले नाही तर ते लोक मला सोडणार नाहीत, असे वारंवार फोन करून सांगितले. यावरून सय्यद अलीचे अपहरण झाले की काय, असा जावेद यांना संशय आला.
जावेद यांनी याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी हे कर्नाटक येथे असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून कर्नाटकातील कलबुर्गी येथे तत्काळ रवाना केले. तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने तीन आरोपींना पकडले. त्यांच्याकडून एक कारही जप्त केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सिद्दपाटील आणि त्यांच्या पथकाने केेली.