बार्शी : लष्करातील चार मराठा लाईट एन्फन्ट्री या युनिटमधील जवान सलीम रजाक शेख (वय ३५, रा. तांदूळवाडी, ता. बार्शी) हे आपली रजा संपवून रेल्वेने परत जाताना अज्ञातांनी त्यांचे अपहरण करून ठार केले. या घटनेमुळे तांदुळवाडी गावावर शोककळा पसरली. ही दुर्दैवी घटना २९ मे रोजी त्यांचे बंधू ताजुद्दीन शेख यांना दूरध्वनीवरून कळविण्यात आली. सलीम शेख हे अरुणाचल प्रदेशातील वैशाखी येथील युनिटमध्ये कार्यरत होते. एक महिन्याची रजा घेऊन ते गावी आले होते. रजा संपल्यानंतर परत आपल्या युनिटमध्ये हजर होण्यासाठी २५ मे रोजी बार्शी येथून दौंडमार्गे रेल्वेने ते निघाले होते. गावातून गेल्यानंतर त्यांचा फोन आला नाही, म्हणून पत्नी जरिना शेख यांनी २८ मे रोजी दुपारी २ वाजता फोनवरून संपर्क साधताच सलीम यांनी मला प. बंगालमधील मालदा या रेल्वे स्टेशनवरून चार-पाच अज्ञात इसमांनी बंदिस्त करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सुटका करण्यासाठी विनंती करीत आहे, असे म्हणून फोन बंद झाला. त्यानंतर त्यांचे चुलत भाऊ हसन शेख यांनी त्यांच्या युनिटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण तो होऊ शकला नाही. त्यानंतर २९ मे रोजी दुपारी १ वाजता चुलत भाऊ ताजुद्दीन शेख हे माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा मृतदेह प. बंगालमधील मालदा रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील जीआरपीएफ या युनिटच्या ताब्यात असल्याची माहिती मिळताच त्यांनी चार मराठा लाईट एन्फंट्री या युनिटशी संपर्क साधला व त्यानंतर या युनिटमधील संजय मधुकर खाटकर यांनी हे प्रेत शवविच्छेदनासाठी मालदा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविले असून, नंतर ते कोलकातामार्गे विमानाने पुण्याला पाठवित आहेत, असे सांगितले. जवान सलीम यांचा मृतदेह रविवार, १ जून रोजी सकाळी ६ वा. १५ मि. कोलकाता येथील विमानतळावरून निघून १० वा. ४५ मि. नी पुण्यात आणण्यात येणार आहे व तेथून २ वाजेपर्यंत तांदुळवाडी येथे आल्यानंतर अंत्यविधी केला जाणार असल्याचे सरपंच गरड यांनी सांगितले
. --------------------------------------
मृत जवान सलीम यांनी १० वीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९९८ साली बेळगाव येथे ४ मराठा लाईट एन्फंट्री या युनिटमध्ये प्रवेश घेतला. आजपर्यंत त्यांनी जम्मू, ग्लेसर, सियाचीन, लडाख, पठाणकोट, राजस्थान येथे सेवा बजावली आहे.