बीड जिल्हा, आष्टी तालुका व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात हैदोस घातलेल्या व एकूण १० पेक्षा अधिक लोकांचे जीव घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करा. जेरबंद करा किंवा शक्य नसेल तर ठार मारा, असे थेट आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी दिले आहेत.
आष्टी तालुक्यात तीन बळी घेऊन करमाळा तालुक्यात आलेल्या नरभक्षक बिबट्याने फुंदेवाडी येथे शेतात पिकास पाणी देण्यासाठी गेलेल्या कल्याण फुंदे व शनिवारी सायंकाळी अंजनडोह येथे लिंबाच्या बागेत लिंबू वेचणारी जयश्री शिंदे या महिलेवर हल्ला चढवून नरडीचा घोट घेतला. शिर व धड वेगवेगळे करून ठार मारल्याने संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. त्याला पकडण्यासाठी सोलापूर, अहमदनगर, बीड येथून वनविभागाचे १०० अधिकारी व कर्मचारी करमाळा तालुक्यात दाखल झाले आहेत. सध्या रावगाव, मोरवड, शेगुड, अंजनडोह, विहाळ, पोंधवडी, उमरड, मांजरगाव या आठ ठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले आहेत.