सोलापूर : श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी झाली. देश- विदेशातून आलेले भाविक श्रींचे मनोभावे दर्शन घेऊन तृप्त झाले. रविवारी एका दिवसात एक लाखाहून अधिक भाविकांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता पुरोहित मंदार व मोहनराव पुजारी यांच्या हस्ते चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत स्वामींची काकड आरती झाली. तद्नंतर स्वामीभक्तांच्या दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. रविवारी नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता देवस्थानच्या वतीने श्रींना महानैवेद्य दाखविण्यात आले. पुणे, दौंड, मालेगाव, मसले चौधरी, बार्शी, उस्मानाबाद, जेजुरी, सोलापूर, मुंबई इत्यादी ठिकाणांहून दिंडी व पालखीसोबत हजारो पदयात्री स्वामीभक्तांनी श्रींच्या दर्शनांचा लाभ घेतला. या दिंडीसोबत आलेल्या हजारो स्वामीभक्तांनी देवस्थानच्या भक्तनिवास येथे महाप्रसादाचा लाभ घेतला. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व भाविकांना शिस्तबद्ध स्वामींचे दर्शन व्हावे यासाठी पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिराच्या दक्षिण महाद्वारालगत भव्य कापडी मंडप उभारण्यात आला होता.
फुलांची सजावट अन् मंदिरात दीपोत्सव
वृद्ध व विकलांग भाविकांना स्वतंत्र व्हीलचेअरवरून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिर गाभारा मंडपास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सायंकाळी ७ वाजता कार्तिक दिवा लावून हजारो दिव्यांच्या दीपप्रज्वलनाने दीपोत्सव साजरा करून त्रिपुरारी पौर्णिमेची सांगता करण्यात आली.