विधानसभा निवडणुकीत केवळ मेहनत, चिकाटी, जिद्दीमुळे प्रचंड इच्छाशक्तीमुळे, पराभूत मानसिकतेमध्ये गेलेल्या पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्याचबरोबर काँग्रेस पक्षालादेखील पुनर्जीवन मिळाले. ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अतिशय एकतर्फी झाले होते. प्रत्येकाला स्वत:ची सत्तास्थाने टिकविण्याची घाई झाली होती. जी सत्तास्थाने केवळ कृपाशीर्वादाने मिळाली होती. त्याबाबत कुठलीही कृतज्ञता न बाळगता, या सर्व स्वार्थी मंडळींनी कसलाही विचार न करता अतिशय कृतघ्नपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. हा सर्व घटनाक्रम माझे आजारी असलेले वडील टीव्हीवर रोज पाहत होते. मी घरी आल्यानंतर वडिलांच्या जवळ त्यांची चौकशी करण्याकरिता गप्पा मारत असे. ते ‘एस काँग्रेस’पासूनचे कार्यकर्ते होते. त्यांनी हे जग सोडण्यापूर्वी माझा हात हातात घेऊन मला एकच गोष्ट सांगितली होती की, ‘आज शरद पवार अडचणीत असले तरी तू आयुष्यभर पवार साहेबांना सोडू नकोस.’ त्यावेळी त्यांना मी म्हणालो होतो की, ‘तुम्ही माझ्यावर दगाबाजीचे संस्कार केले नाहीत’ त्यामुळे, ‘तुम्ही सांगितले म्हणून नव्हे तर तुम्ही केलेल्या संस्कारामुळे मी कधीच पवारांना सोडणार नाही’. अर्थात मी पक्षाचा त्या अर्थाने लाभार्थी नाही; परंतु सार्वजनिक जीवनामध्ये आज जे काही माझे नाव झाले, सन्मान मिळाला, पदे मिळाली, काम करण्याची संधी मिळाली, मानसन्मान मिळाला, स्वतःची ओळख निर्माण करता आली, ते सर्व केवळ आणि केवळ ‘शरद पवार’ नावाची रॉयल्टी मोफत मिळत होती म्हणून हे शक्य झाले.
गुणवत्तापूर्ण ध्येयासक्त कार्यकर्त्यांची संख्या दुर्मीळ झाली आहे. राजकीय क्षेत्राचे परिमाण बदलल्यामुळे, अतिशय भंपक व तकलादू कार्यकर्त्यांची गर्दी वाढून एकूणच राजकीय व्यवस्थेचे उद्दिष्ट कलुषित होत आहे. त्यामुळे अगाध दूरदृष्टी असलेल्या जबाबदार नेत्यांकडून आजच्या तरुण पिढीला विशेष अपेक्षा आहे. वयाच्या ८० व्या वर्षी कितीही कठीण प्रसंग आला तरीही खचून न जाता निर्धाराने व कठोर परिश्रमाने अशा अडचणीच्या परिस्थितीवर मात करता येऊ शकते. हा अत्यंत दूरगामी संस्कार आपण आजच्या तरुण पिढीवर केला आहे. कुठल्याही सत्तेपेक्षा आपण दिलेला हा संस्कार लाखमोलाचा आहे. देश घडविणारा व आजच्या तरुण पिढीला दिशा देणारा हा संस्कार कुठल्याही शालेय अभ्यासक्रमातून शिकवण्याची यापुढे आवश्यकता भासणार नाही. पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोगामी विचार संपुष्टात येऊन फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना यशवंतराव चव्हाणांच्या या मानसपुत्राने अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात हा महाराष्ट्र वाचवणारा विचार जिवंत ठेवण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही बाब महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जावी, एवढे आपले कर्तृत्व ऐतिहासिक व महान आहे.
धन्यवाद
आपला विश्वासू कार्यकर्ता
- उमेश पाटील