शहाजी फुरडे-पाटील
सोलापूर/बार्शी : छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. बार्शीत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला आहे. घरात कुटुंबासह शिवजन्मोत्सव साजरा करता यावा यासाठी चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ आणि त्यांच्या कुटुंबाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एक हजार मूर्ती तयार केल्या. मूर्तीची घरातही प्रतिष्ठापना करता यावी म्हणून हळदी कुंकवासह सुवासिनींच्या हाती सोपविल्या. छत्रपतींच्या स्वागतासाठी जिजाऊंच्या लेकी पुढे सरसावल्या आहेत.
शिवजन्मोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्याची तयारी सध्या सर्वत्र सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी पुरुष मंडळींना तो साजरा करता येतो, मात्र महिलांना करता येत नसल्याने चित्रशिल्पकार पांडुरंग फफाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला. विशेष म्हणजे फफाळ कुटुंबातील पांडुरंग यांच्यासह त्यांची आई कमल साहेबराव फफाळ, पत्नी उज्ज्वला, मुले आर्या, अविरत तसेच भाचे सिद्धी व समर्थ उघडे यांनी स्वत: रात्रंदिवस जागून महाराजांच्या या मूर्ती बनविल्या. कोणतेही शुल्क न घेता केवळ छत्रपतींचा विचार, आचार घराघरात पोहोचावा या उदात्त हेतुने फफाळ कुटुंबाने हा उपक्रम राबविला आहे. शहराच्या विविध भागांतील महिलांच्या हाती या मूर्ती सुपूर्द केल्या.
महाराजांच्या विचारांतून प्रेरणा...
शिवजन्मोत्सव साजरा करताना तो घरातील प्रत्येकाला साजरा करता यावा, विशेष करून महिलांनी घरातही मूर्तीची प्रतिष्ठापना करावी हा विचार मनात आला. हा विचार पत्नीला, आईला बोलून दाखविला. घरातील सर्वांनीच याला होकार दिलाच, तसेच आम्ही स्वत: या मूर्ती तयार करू, असा नवा विचारही मांडला. यानंतर एक हजार मूर्ती तयार करण्यात आल्या. सर्व मित्रांनीही याचे कौतुक करत आणखी प्रोत्साहन दिले. खरे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प तयार करत असताना त्यांचा इतिहास वाचत होतो. यातूनच मला या उपक्रमाची प्रेरणा मिळाली.पाडूरंग फफाळ, चित्रशिल्पकार, बार्शी