सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जसजशी गती येत आहे तसेच शहरातील तापमानही वाढत चालले आहे. वाढत्या तापमानामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची दमछाक होत असून रणरणत्या उन्हात प्रचार करताना काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दर पाच वर्षांनी येणाºया लोकसभा निवडणुका एप्रिल-मे महिन्यात येत असतात. या दोन महिन्यात सर्वत्र उन्हाचा कडाका असतो. सोलापूर ‘ड्राय वेदर’ सिटी असल्यामुळे येथे कोरडी उष्णता असते. या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत सध्या उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते हे प्रचार फेरीद्वारे घरोघरी पोहोचत आहेत. कडक उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कार्यकर्त्यांनी डोक्यावर टोपी, अंगात सुती कपडे, डोळ्यांवर गॉगल आणि सोबत पाण्याची बाटली ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जास्तीत जास्त पाणी पिऊन बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळल्यास तब्येत बिघडण्याचा धोका कमी संभवतो, असेही तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.
भर उन्हात थंडपेय टाळारणरणत्या उन्हात प्रचारासाठी फिरणाºया कार्यकर्त्यांनी शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहील, यासाठी प्रयत्न करणे, हाच उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. दुपारी जेव्हा सर्वाधिक तापमान असते, अशावेळी डोके व शरीर यांना संरक्षण द्या. प्रचार करून घरी आल्यानंतर लगेच थंड पेय पिण्याचे टाळावे. दिवसातून दोन वेळा थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करावी. याउपरही प्रकृती बिघडल्यासारखे वाटल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. - डॉ. एस. बी. कांबळे सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी
उष्णतेचा पारा वाढण्याची शक्यतायावर्षी एप्रिलच्या प्रारंभीच पारा ४३ अंशाकडे वाटचाल करत आहे. ही स्थिती अशीच राहिली तर मे अखेरपर्यंत सोलापुरातील गेल्या तीस वर्षांतील उच्चांकी तापमान असू शकते. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि पाण्याच्या साठ्यांचे संवर्धन होत नसल्यामुळे यापुढे वरचेवर तापमानात वाढ होत जाणार आहे. यावर तोडगा म्हणून मोठ्या प्रमाणावर वनीकरण करण्याची गरज आहे. - डॉ. विनायक धुळप, हवामान तज्ज्ञ
हे कराल तर फिट राहाल
- 1.घराबाहेर पडताना पातळ, सुती, फिक्या किंवा पांढºया रंगाचे कपडे वापरावेत.
- 2. डोक्याला टोपी, डोळ्यांना गॉगल असावा. उन्हाच्या झळा लागू नयेत, यासाठी संपूर्ण अंग झाकणारे असावेत.
- 3. तिखट, खूप गरम, रुक्ष असे पदार्थ टाळावेत. ताक भरपूर प्यावे. कैरीचे पन्हे, कोकम सरबत, लिंबूचे सरबत, शहाळाचे पाणी प्यावे.
- 4. उसाच्या रसात किंवा कोणत्याही पेयात बर्फ टाकून घेऊ नका.