सोलापूर : राज्यातील विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे.. अहमदनगर आणि सोलापूर वगळता इतर ५ मतदारसंघात ६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र सोलापूर विधान परिषदेची निवडणूक वगळण्यात आली आहे.
विधान परिषद मतदार संघातील एकूण मतदारांपैकी किमान 75 टक्के मतदार पात्र असणे आवश्यक आहे. मात्र सोलापूरमध्ये नव्याने नगरपालिका आणि नगरपंचायतीची स्थापना झाली आहे. एकूण मतदारांपैकी 75 टक्के मतदार पात्र नसल्याचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर गेल्याची माहिती देण्यात आली.
राज्यातील अन्य जागेच्या विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. याची अधिसूचना १६ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२१ असणार आहे. तर २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. १० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे. 16 डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.