सोलापूर : महापालिका परिवहन समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत भाजपचे सदस्य जय साळुंखे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या परशुराम भिसे यांचा पराभव केला. काँग्रेसच्या दोन सदस्यांनी गैरहजर राहून विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि त्यांच्या उमेदवाराला एकटे पाडले. त्यामुळे भाजपची गाडी सुसाट गेली.
परिवहन समिती सभापती निवडीसाठी मनपाच्या सावित्रीबाई फुले सभागृहात निवडणूक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांनी काम पाहिले. सभापतीपदासाठी साळुंखे आणि भिसे यांनी अर्ज दाखल केला होता. परिवहन समितीत एकूण १२ सदस्य आहेत.
यात भाजपच्या जय साळुंखे, शिवलाल आळसंदे, अशोक यनगंटी, गणेश जाधव, भैरण्णा भैरामडगी, नागनाथ शिवसिंगवाले (एकूण सहा), शिवसेनेचे तुकाराम मस्के, विजय पुकाळे, परशुराम भिसे (तीन), काँग्रेसचे तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे (दोन), एमआयएमचे शाकीर सगरी यांचा समावेश आहेत.
सभापती निवडीसाठी मतदान झाले. साळुंखे यांना भाजपच्या पाच सदस्यांनी मतदान केले तर भिसे यांना सेनेच्या तीन सदस्यांनी मतदान केले. भाजपचे भैरण्णा भैरामडगी आणि काँग्रेसचे तिरुपती परकीपंडला आणि गणेश साळुंखे गैरहजर राहिले. एमआयएमचे शाकीर सगरी तटस्थ राहिले.
निवडीनंतर भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख, मनीष देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, मावळते सभापती गणेश जाधव यांच्या उपस्थितीत जय साळुंखे यांचा सत्कार झाला.
काँग्रेसचे दोन सदस्य गैरहजर राहिले- राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आहे. परिवहन सभापतीपदाच्या निवडीत शिवसेना, काँग्रेस आणि एमआयएमचे सदस्य एकत्र येतील आणि शिवसेनेचे परशुराम भिसे विजयी होतील, असा दावा विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केला होता. परंतु, कोठेंनी काँग्रेसला विश्वासात न घेताच भिसे यांचा अर्ज भरल्याचे काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी सोमवारी बोलून दाखविले. काँग्रेसचे लोक कुठेही जाणार नाहीत. आपल्या मागे येतील, असा भ्रम कोठे गटात होता. अखेर काँग्रेसच्या दोन सदस्यांनी गैरहजर राहून कोठे गटाला एकटे पाडले.
भाजप हा कार्यकर्त्यांना सांभाळणारा पक्ष आहे. कोठे केवळ नातेवाईकांना प्राधान्य देतात हे सर्वांना कळून चुकले आहे. काँग्रेसच्या जीवावर त्यांनी भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. पण कोठे आता उघडे पडले आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेतील लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांनी आता राजकारण सोडून घरी बसावे. परिवहनचा कारभार भाजपचे लोक उत्तमपणे सांभाळतील.- गणेश जाधव, मावळते सभापती.
परिवहन समितीला चांगले दिवस यावेत यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार. जास्तीत जास्त बस शहरात धावाव्यात. कामगारांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. - जय साळुंखे, सभापती, परिवहन समिती, मनपा.