बेलाटीचे जगन्नाथ पाटील, कवठ्याचे महादेव पाटील, दत्ता देवकते व इतरांना पैलवानकीचा छंद. यातूनच यांची मैत्री झाली. ही सर्व मंडळी पुढे राजकीय क्षेत्रात उतरली. कोण विकास सोसायटी, कोण ग्रामपंचायतच्या कारभाराकडे वळले. दत्ता देवकते ३५ वर्षे विकास सोसायटीचे चेअरमन होते. महादेव पाटील सरपंच व जिल्हा परिषद सदस्य होते. मात्र कोरोनाने ही जोडगोळी एकापाठोपाठ एक मयत झाली. दत्ता देवकते यांच्या निधनानंतर पत्नी शीला पाचव्या तर महादेव पाटील यांच्या निधनानंतर पत्नी शशिकला तिसऱ्या दिवशी मयत झाल्या. तलाठी कार्यालयाचे कोतवाल उद्धव रजपूत यांना कोरोनाने गाठल्यानंतर चौथ्या दिवशी वडील रतन रजपूत यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या मते कोरोनामुळे कवठ्यात १४ व्यक्तींचा मृत्यू झाला; मात्र आरोग्य खात्याकडे पाच व्यक्तींचीच नोंद आहे.
अनेक वर्षे विकासाचा गाडा हाकणारे पैलवान म्हणून ओळख निर्माण केलेले महादेव पाटील, दत्ता देवकते पती-पत्नी तसेच कोतवाल उद्धव व त्यांचे वडील रतन रजपूत हे कोरोनामुळे अचानक गेल्याने कवठे गावाला धक्का बसला आहे.
मृत्यूच्या नोंदीचा घोळ
पाटील, देवकते पती-पत्नी, रजपूत बापलेक यांच्यासह १४ व्यक्ती कोरोनामुळे दगावल्याचे गावकरी सांगतात. आरोग्य विभागाकडे मात्र या सर्व लोकांची नोंद नसल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आकडेवारीत घोळ दिसत आहे. ५७ व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या, त्यापैकी १४ लोकांना जीव गमवावा लागला.
----