राजीव लोहकरे माळशिरस : माळशिरस विधानसभेसाठी यंदा ६६.७७ टक्के इतके मतदान झाले. गत पंचवार्षिक निवडणुकीत हा आकडा ७७.७२ टक्के इतका होता. यंदा मतदानाचा टक्का कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कमी मतदान झाल्याचा फटका कुणाला बसणार, याबाबतची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
माळशिरस मतदारसंघात यंदा तोडीस तोड उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. चांदापुरी येथील शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर राष्ट्रवादीच्या तिकिटावर तर भाजपकडून राम सातपुते निवडणूक मैदानात आहेत. भाजपकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उत्सुकता लागून राहिली होती. अखेरच्या दिवशी राम सातपुते यांचे नाव निश्चित करण्यात आले. दोन मुख्य उमेदवारांसह वंचित बहुजन आघाडी व इतर उमेदवार विधानसभेच्या मैदानात उतरलेले आहेत. मात्र महायुतीचे राम सातपुते व काँग्रेस- राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उत्तमराव जानकर या दोघांतील सामना लक्षवेधी ठरत आहे. अटीतटीच्या या लढतीत निसटता विजय कोणाच्या पदरात पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात भाजप, काँग्रेससह वंचित आघाडीनेही आपापल्या नेत्यांच्या सभा ठेवल्या होत्या. प्रचाराची सुरुवातच जोरदार पद्धतीने झाली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी श्रीगणेशा करून भाजपचा प्रचार सुरू केला तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेळापूर येथून प्रचाराचा मुहूर्त साधला. यानंतर खा. अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्टÑवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आल्या. स्थानिक प्रचाराला मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांनी पायाला भिंगरी बांधली होती तर राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनीही प्रचाराची गरुड झेप घेत तालुका पिंजून काढला होता.
तालुक्यातील राजकीय लढतींचा इतिहास बघता मोहिते-पाटील गट व मोहिते-पाटील विरोधी गट या दोन्ही गटांमधील संघर्ष पारंपरिक पद्धतीने पुढे आलेला आहे. तालुक्याचा पश्चिम भाग मोहिते-पाटील विरोधकांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यावेळी या भागातील काही बड्या नेत्यांनी भाजपला साथ देत मोहिते-पाटलांसोबत जाणे पसंत केले तर पूर्वभाग मोहिते-पाटील गटाचा बालेकिल्ला मानला जातो. याही गटातील काही दिग्गजांनी मूळ पक्षात थांबत विरोधी गटाच्या हातात हात दिला.
आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी- तालुक्यात मोहिते-पाटलांनी विकासकामांची आकडेमोड मतदारांच्या पुढे मांडत, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, समांतर पाईपलाईन या मुद्यांवर भर दिला. विरोधी गटाने तालुक्याचा स्वाभिमान व स्थानिक उमेदवारीच्या मुद्यावर प्रचार केला. तालुक्यातील डबघाईला आलेल्या साखर उद्योगावर टीकाटिप्पणी दोन्ही गटांनी टाळल्याचे दिसून आले. उत्तमराव जानकर यांच्या जातीच्या दाखल्याची चर्चाही निवडणुकीदरम्यान गाजली तर धनंजय मुंडे यांनी प्रचार सभेदरम्यान राम सातपुते यांच्यावर भीमा-कोरेगाव दंगलीचा आरोप केला. अशा अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.