सोलापूर : पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून माजी नगरसेवकाच्या मेव्हण्याचा खून केल्याची घटना कुर्डूवाडी बायपास टोलनाक्याजवळ घडली. विकी गायकवाड (रा. माळशिरस) असे खून करण्यात आलेल्याचे नाव आहे.
विकी गायकवाड हा कुर्डूवाडी येथे आपले मेव्हणे माजी नगरसेवक अमरकुमार माने यांच्याकडे राहत होता. विकी हा रविवारी दुपारी अमरकुमार माने यांना माढा येथे भेटायला जाताना त्याच्या गाडीवर अज्ञात तरूणांनी दगडफेक केली. तो गाडीतून खाली उतरून जाताना त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा खून करण्यात आला. त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. एप्रिलमध्ये विकी गायकवाड, अमर माने यांच्यासह त्यांच्या पाच मित्रांवर प्राणघातक हल्ला, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणी विकी गायकवाडला जामीन मिळाला होता. तो माढा पोलिसांत हजेरी लावून माढ्याकडे जाताना ही घटना घडली़ आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.
पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झाली नसून, या घटनेमुळे ग्रामीण रूग्णालयात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. याबाबत संतोष विश्वंभर माने यांच्या फिर्यादीवरून माणिक धनंजय श्रीरामे, आकाश सुरेश राजगिरे,विनोद उर्फ एक्या विजय सोनवणे, अनंत विजय सोनवणे, आकाश श्रीरामे, अर्जुन श्रीरामे, संतोष मारकड, सूरज सुभाष जगताप, सुभाष उर्फ बापूसाहेब जगताप, आक्रम खान, इम्रान रफीक पठाण व इतर १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल झाला असून तपास पो. नि. ईश्वर ओमासे करीत आहेत.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांनी भेट दिली.
शवविच्छेदन करण्यास नकार
- - आरोपींना अटक करेपर्यंत विकी गायकवाड याचे शवविच्छेदन करण्यास मृताच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे हे ग्रामीण रुग्णालय येथे आले असता त्यांना मृताच्या नातेवाईकांनी घेराव घालत आरोपीला अटक करा, अशी मागणी केली.
- - रात्री आठ वाजता अमर माने यांना माढा कारागृहातून कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीत अमर माने यांनी शहरातील अवैध मद्य विक्री बंद करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर माणिक श्रीरामे व त्याचे सहकारी यांच्यात पोलीस ठाण्याच्या आवारातच बाचाबाची झाली होती. त्यानंतर ९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मागील भांडणाचा राग मनात धरुन सध्या मयत असलेला विकी गायकवाड, अमर माने यांच्यासह पाच जणांनी माणिक श्रीरामे व त्याचा भाऊ अर्जुन याच्यावर हल्ला करुन गंभीर जखमी केले होते.
- - या गुन्ह्यातच अटकेत असलेला विकी गायकवाड याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी जामिनावर सुटका करण्यात आली होती. मात्र त्याचा मेहुणा अमर माने हा माढा कारागृहातच होता. याला भेटण्यास जात असतानाच हा प्रकार घडला.