कुर्डुवाडी : माढा तालुक्यातील कुर्डू व लऊळ ग्रामपंचायती आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठ्या आहेत. येथील ग्रामपंचायत सदस्यसंख्या ही १७ ची आहे. यंदा येथील दोन्ही गावांतील तत्कालीन सत्ताधाऱ्यांना स्वतःविषयी असणारा अतिआत्मविश्वास नडला म्हणूनच त्यांना गावकऱ्यांनी बाहेरचा रस्ता दाखविला आहे. दोन्ही गावांत सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्यालाच सरपंचपद मिळावे म्हणून पार्टीप्रमुखांना अनेक सदस्यांनी साकडे घातले आहे.
कुर्डू ग्रामपंचायत निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी गटाचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील व माजी उपसरपंच संदीप पाटील यांच्या शांतता ग्रामविकास आघाडीच्या विरोधात थेट माजी सरपंच व वस्ताद आण्णासाहेब ढाणे यांच्या नागनाथ ग्रामविकास आघाडीत चुरशीची लढत झाली होती. यामध्ये दोन्ही गटांनी प्रयत्न केले, पण गावच्या राजकारणात जयंत पाटील यांच्या गटाला बाहेर जावे लागले. त्यामुळे वस्ताद आण्णासाहेब ढाणे यांच्या गटाला १७ पैंकी १६ जागांवर विजय मिळविता आला आहे. येथील सरपंचपद हे सर्वसाधारण महिला आरक्षित असून सध्या सरपंचपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. परंतु, शेवटी पार्टी प्रमुख आण्णासाहेब ढाणे ठरवतील तोच येथील सरपंच होणार आहे. येथून सुप्रिया कापरे, उषा नरखेडकर, उमेश पाटील, सविता अनंतकवळस, कुंताबाई चोपडे,सुधीर लोंढे,पद्मिनी माळी,अर्चना जगताप,धनंजय गोरे,वंदना भोसले,महावीर गायकवाड, नितीन गोरे,लतिका जगताप,आण्णासाहेब ढाणे,सोजर माळी, व रसिका जगताप असे आण्णासाहेब ढाणे यांच्या गटाचे विजयी सदस्य आहेत तर जयंत पाटील यांच्या गटाचा अमोल गायकवाड हा एकच उमेदवार सदस्य म्हणून निवडून आला आहे.
याबरोबरच लऊळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दरलिंग ग्रामविकास आघाडी विरूद्ध स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीत चुरशीची लढत झाली होती. त्यात तत्कालीन सत्ताधारी गटाला आपणच सत्तेत येणार हा आत्मविश्वास नडला आणि सत्तेपासून बाजूला व्हावे लागले. त्यामुळे दरलिंग गटाचे प्रमुख माजी उपसभापती प्रतापराव नलवडे यांच्या गटाला गटाला १७ पैकी १० जागांवर विजय मिळवून सत्तेची संधी जनतेने दिली आहे. तत्कालीन सत्ताधारी गटाला यंदा फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागले. येथे सिद्धेश्वर गटालाही १ जागेवर विजय मिळविता आला. येथे सरपंचपदाचे आरक्षण ओबीसी पुरुष वर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे येथून ओबीसी जागेवरून निवडून येणाऱ्यांची बहुसंख्य संख्या पाहता प्रत्येकाला आपणच सरपंच होतो की काय, असे वाटू लागले आहे. परंतु, हा निर्णय पार्टीप्रमुख प्रतापराव नलवडे यांच्या हातात आहे. येथे दरलिंग ग्रामविकास आघाडीचे महेश बागल, संजय लोकरे, पूजा बोडके, यशश्री गांधले, अश्विनी भोंग, कल्याण गाडे, सत्यभामा लोकरे, लक्ष्मण भोंग, मनीषा गवळी, दीपाली मांदे हे दहा सदस्य आहेत तर सिध्देश्वर ग्रामविकास आघाडीच्या शांताबाई घुगे या एकमेव सदस्या आहेत. तत्कालीन सत्ताधारी स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीचे प्रियंका कांबळे, नामदेव भोंग, सावित्रा गणगे, निर्मला नलवडे, खंडू भोंग,रुपाली जानराव असे सहा सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
...................