येथील कारखान्यात ५११ अधिकारी, कर्मचारी व इतर वर्गांच्या विविध पदांची भरतीही रेल्वेच्या आरआरसीमार्फत लवकरच करण्यात येणार आहे. येथील रेल्वे गेटच्या भुयारी मार्गासाठीही अर्थसंकल्पात निधी उपलब्ध केला असल्याने त्याचेही रखडलेले काम सहा महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. याबद्दल रेल्वे कारखान्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच, रेल्वे कारखाना संघर्ष समिती व सर्वसामान्य नागरिकांत आनंद व्यक्त होत आहे.
एकेकाळी स्थलांतरित होणार की काय अशा परिस्थितीत असणारा रेल्वे कारखाना आता नव्याने ऊर्जावस्थेत येत असल्याने शहरवासीयांनाही या रेल्वे कारखान्याविषयी भविष्य वाटू लागले आहे. येथील रेल्वे कारखान्याविषयी शहरातील अनेक पक्षांच्या लोकनेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दिल्ली वाऱ्या केलेल्या आहेत.
याबाबत रेल्वे कारखान्याचे उपमुख्य यांत्रिकी अभियंता संजय साळवे यांना विचारले असता आपल्या कारखान्याला निधी मिळणे हे अपेक्षितच होते. केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या कामासाठी कसे निधीचे विवरण आहे हे अद्यापपर्यंत माझ्याकडे आले नसल्याचे त्यांंनी सांगितले. भविष्यात या कारखान्यासाठी खूप निधी येणार असून, शहराचे पुन्हा नंदनवन होणार आहे. कारखान्याला एकदा रेल्वेमंत्र्यांनी भेट द्यावी, अशी अपेक्षा कामगार नेते महेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.