सोलापूर : सर्वसामान्य व्यक्तींना पैशांअभावी चांगली औषधे मिळत नाहीत. या लोकांसाठी महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये औषध बँक सुरू करण्याचा निर्णय आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे.
कोरोनाकाळात जास्तीत जास्त लोकांवर मोफत उपचार व्हावेत यासाठी आयुक्तांनी अल्पावधीत बॉईस हॉस्पिटल, राज्य कामगार विमा हॉस्पिटल, काडादी मंगल कार्यालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. आता लोकांना चांगली औषधे मिळावीत यासाठी ते औषध बँक सुरू करणार आहेत. नव्या उपक्रमाबद्दल आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, अनेक लोक महागडी औषध-गोळ्या खरेदी करतात. बरे झाल्यानंतर ही औषधे पडून असतात किंवा कचऱ्यात टाकून दिली जातात. ही औषधे लोकांनी महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जमा करायची आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये एक पेटी ठेवण्यात येईल. एक्सपायरी डेट संपली असेल तर औषधे देऊ नका. माणुसकीच्या भावनेतून औषधे द्या. शक्य ती मदत करा. महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात औषधे दिली जातात; परंतु, आमच्याकडे उपलब्ध नसलेली औषधे या औषध बँकेतून मिळतील. सामाजिक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
फुंडीपल्लेंकडून पालिकेला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर भेट
रोटरी क्लब सोलापूरचे माजी अध्यक्ष स्व. बंडप्पा बाबूराव फुंडीपल्ले यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव उमाशंकर व नातू सौरभ फुंडीपल्ले यांनी महानगरपालिकेस ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन दिली. आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे ही मशीन सुपूर्द केली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, रोटरी क्लबच्या अध्यक्षा पूनम देवदास, सचिव अर्जुन अष्टगी, हिरालाल डागा, सुधीर मद्दी, गणेश धोतरे, सिद्धाराम खजुरगी, गणेश आडम, नारायण सिंधी, सूरज देवदास, साहिल करकमकर, पवन अग्रवाल, प्रमोद माढेकर आदी उपस्थित होते.